Iran Israel War : इराण आणि इस्त्राइल यांच्यात युद्धाला सुरुवात झाली आहे. इराणवर अमेरिका आणि इस्रायलनं हल्ला केल्यानं मध्य पूर्वेत पुन्हा एकदा तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. या हल्ल्यानं संपूर्ण मध्य पूर्व आशियासमोर युद्धाचं संकट आ वासून उभं आहे. आखातातील या परिस्थितीवर भारताने चिंता व्यक्त केली आहे. युद्ध टाळून चर्चेचा मार्ग अवलंबण्याचं आवाहन भारतानं केलं आहे. सर्व देशांमधील भारतीय सरकारचे प्रतिनिधी संस्था भारतीयांच्या संपर्कात आहेत.
सर्व भारतीयांनाही संपर्कात राहण्याचं आवाहन सरकारनं केलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहुंसोबत फोन केल्याची माहिती मिळत आहे. ट्रम्प यांचा अमेरिकन सुरक्षा टीम सोबतही संवाद झाला आहे. पश्चिम आशियातील जवळपास सर्वच देशांमध्ये भारतीयांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन केलं आहे. भारत सरकारकडून सर्वांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आलं आहे. भारतीय दूतावास उच्चायुक्तालय यांच्या संपर्कात राहण्याचा सल्ला दिला आहे.
इस्त्रायल आणि इराण संघर्षाला आता भयंकर स्वरुप आलं असून त्यामध्ये निष्पापांचा बळी जात आहे. दक्षिण इराणमधील मिनाब जिल्ह्यातील मुलींच्या प्राथमिक शाळेवर झालेल्या भीषण हवाई हल्ल्याने एकच खळबळ उडाल्याचं चित्र आहे. अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त कारवाईदरम्यान शनिवारी झालेल्या या बॉम्बहल्ल्यात शाळेत शिकणाऱ्या 85 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. मृतांचा आकडा अजून वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
इस्त्रायल्या या हल्ल्यात शाळेची दोन मजली इमारत मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाली आहे. इमारतीचा मोठा भाग कोसळला असून एका बाजूला भीषण आग लागल्याची घटना घडली. हल्ल्याच्या वेळी शेकडो विद्यार्थिनी शाळेत उपस्थित होत्या, अशी माहिती स्थानिक सूत्रांनी दिली आहे. या घटनेचे दोन व्हिडीओ समोर आले असून एका व्हिडीओत शाळेची उद्ध्वस्त इमारत आणि परिसरात जमलेली मोठी गर्दी दिसत आहे, तर दुसऱ्या व्हिडीओत मृत विद्यार्थिनींच्या शाळेच्या बॅग दिसत आहेत. इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला. 'दक्षिण इराणमधील मुलींच्या प्राथमिक शाळेवर दिवसाढवळ्या बॉम्बहल्ला करण्यात आला, जेव्हा ती शाळा विद्यार्थिनींनी खचाखच भरलेली होती. यामध्ये निष्पाप मुलींची हत्या करण्यात आली. इराणी जनतेविरुद्धचे हे अपराध दुर्लक्षित केले जाणार नाहीत' असं त्यांनी म्हटलं आहे.