टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत दक्षिण अफ्रिकेने जबरदस्त कामगिरी केली आहे. साखळी फेरीनंतर सुपर 8 फेरीतील सर्व सामन्यात विजयी नोंद केली आहे. सुपर 8 फेरीत दक्षिण अफ्रिकेचा शेवटचा सामना झिम्बाब्वेशी झाला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा झिम्बाब्वेच्या बाजूने लागला आणि त्यांनी प्रथम फलंदाजी स्वीकारली. झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडी गमवून 153 धावा केल्या आणि विजयासाठी 154 धावा दिल्या. दक्षिण अफ्रिकेने हे आव्हान 5 गडी राखून पूर्ण केलं. दक्षिण अफ्रिकेने या आधीच उपांत्य फेरीत जागा मिळवली आहे. दक्षिण अफ्रिकेचा उपांत्य फेरीत न्यूझीलंडशी सामना होणार आहे. हा सामना 4 मार्च रोजी होणार आहे.
झिम्बाब्वेने विजयासाठी दिलेल्या धावांचा पाठलाग करताना दक्षिण अफ्रिकेची सुरुवात काही चांगली झाली नाही. क्विंटन डीकॉकला खातंही खोलता आलं नाही. तर कर्णधार एडन मार्करम 4 धावा करून बाद झाला. त्यानंतर रायन रिकल्टन आणि डेवॉल्ड ब्रेव्हिस यांनी मोर्चा सांभाळला. या जोडीने 29 धावांची भागीदारी केली. रायन रिकल्टन 31 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर मिलर आणि ब्रेव्हिसची जोडी जमली. या जोडीने 46 धावा केल्या. पण मिलर 22 धावांवर असताना बाद झाला. त्यामुळे दक्षिण अफ्रिकेचा संघ दडपणाखाली आला.
झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी स्वीकारली पण सुरूवात काही चांगली झाली नाही. आघाडीचे तीन फलंदाज स्वस्तात बाद झाले. तदिवानाशे मारुमणी 7, ब्रायन बेनेट 15, डायन मायर्स 19 धावा करून बाद झाले. त्यानंतर कर्णधार सिकंदर रझा याने मोर्चा सांभाळला. त्याने 43 चेंडूत 8 चौकार आणि 4 षटकार मारत 73 धावांची खेळी केली. त्याला इतर फलंदाजांकडून हवी तशी साथ मिळाली नाही. रायन बर्ल 5, टोनी मुनयोंगा 2, ब्रॅड इव्हान्स 8 धावांवर बाद झाले. तर क्लाईव्ह मदंडे नाबाद 26 आणिवेलिंग्टन मसाकाड्झा नाबाद 1 धावेवर राहिला. दक्षिण अफ्रिकेकडून क्वेना माफाका 2, कॉर्बिन बॉशने 2, जॉर्ज लिंडेने 1, लुंगी एन्गिडी 1 आणि अँरिक नॉर्टजे 1 विकेट घेतली.