वैराग : दहिटणे (ता. बार्शी) येथे शेतात जनावरे घेऊन गेलेल्या शेतकऱ्याचा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (ता. २७) दुपारी घडली आहे. अर्जुन घोंगाणे (वय ५२) असे मृताचे नाव आहे.
मृताचा भाऊ कृष्णा भिवा घोंगाणे यांनी वैराग पोलिसांत माहिती दिली. अर्जुन घोंगाणे (वय ५२) हे सकाळी जनावरे घेऊन शेतात गेले. नदीच्या कडेला जनावरे चरायला सोडून द्राक्ष काढण्यासाठी कामाला गेले होते. त्यानंतर ते दुपारी चार वाजता पुन्हा जनावराकडे आले होते. दरम्यान फिर्यादीच्या मुलाने चुलते सायंकाळी घरी न आल्याने नदीला जाऊन पाहिले असता जनावरे तेथेच नदीवरच होती. मात्र चुलते तेथे दिसले नाहीत.
त्यामुळे त्याने जनावरे घरी आणली. चुलत्याचा गावात शोध घेतला मात्र ते कोठेच आढळून आले नाहीत. दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता नदीकडे जनावरे चरायला सोडलेल्या ठिकाणी मृताची पत्नी व फिर्यादीचा मुलगा तेथे गेले असता त्यांना अर्जुन घोंगणे हे पाण्यात पडलेले दिसले. त्यांना पाण्याबाहेर काढले असता त्यांच्या डोक्याला व तोंडाला जखम दिसून आली. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.