T20 WC, IND vs WI : जसप्रीत बुमराहने ३ चेंडूंत फिरवलेली मॅच, पण वेस्ट इंडिजच्या फलंदाजांची खणखणीत फटकेबाजी; भारतासमोर तगडे लक्ष्य
esakal March 02, 2026 12:45 AM

India Fight Back as Windies Post Strong Total Marathi Cricket Updates : भारतीय संघाने सुपर ८ च्या शेवटच्या साखळी सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध चांगले पुनरागमन केले. जसप्रीत बुमराहच्या ( Jasprit Bumrah) एका षटकाने संपूर्ण सामन्याला कलाटणी दिली. त्याने विंडीजच्या दोन सेट फलंदाजांना घरचा रस्ता दाखवला आणि त्यानंतर विकेटचे सत्र सुरू झाले. पण, तगडी बॅटींग लाईनअप असलेल्या वेस्ट इंडिजने तगडे लक्ष्य उभे केले. जेसन होल्डर व रोव्हमन पॉवेल यांची भागीदारी सामन्याला पुन्हा विंडीजच्या बाजूने झुकवणारी ठरली.

कर्णधार शे होप आज भारतीय गोलंदाजांसमोर संघर्ष करताना दिसला आणि तो ३३ चेंडूंत ३२ धावांवर वरुण चक्रवर्थीच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्यानंतर रोस्टन चेस व शिमरोन हेटमायर या जोडीने विंडीजची धावगती वाढवण्याचा चांगला प्रयत्न केला आणि सूर्याने १२व्या षटकात जसप्रीतला गोलंदाजीला पुन्हा बोलावले. जस्सीने तिसऱ्या आणि पाचव्या चेंडूवर या दोन्ही सेट फलंदाजांना बाद केले.

T20 WC, IND vs WI : शिमरोन हेटमायरच्या विकेटवरून 'राडा'! विडींजच्या खेळाडूंची तीव्र नाराजी, वातावरण तापले; जसप्रीतने दिले २ धक्के

हेटमायर १२ चेंडूंत १ चौकार व २ षटकाराने २७ धावा केल्या, तर चेसने २५ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ४० धावांची खेळी केली. हेटमायरच्या विकेटवरून वाद रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. पहिल्या तीन षटकांत ३३ धावा देणाऱ्या हार्दिकने त्याच्या चौथ्या षटकात शेरफाने रुथरफोर्डला ( १४) बाद करून विंडीजला बॅकफूटवर फेकले.

१६व्या षटकात अर्शदीपच्या गोलंदाजीवर रोव्हमॅन पॉवेलने २४ धावा कुटल्या. या सामन्यातील हे सर्वात महागडे षटक ठरले. जेसन होल्डरही हात साफ करताना दिसला आणि विंडीज फलंदाजांचे उत्तुंग षटकार भारतीय चाहत्यांची झोप उडवणारे ठरत होते. वरुणच्या चौथ्या षटकात होल्डरने १४ धावा कुटल्या. वरुणने ४-०-४०-१ अशी स्पेल संपवली. हार्दिकनेही ४ षटकांत ४० धावा देत १ विकेट घेतली. होल्डर व पॉवेल यांनी २२ चेंडूंत ५० धावांची भागीदारी पूर्ण केली.

T20 WC, IND vs WI : विंडीजचे दोन्ही सलामीवीर एकाच दिशेने पळाले, पुढे काय घडले? बसणार नाही विश्वास, अर्शदीप सिंग स्टम्पकडे पळाला अन्...

अभिषेकने आणखी एक झेल सोडला आणि यावेळी पॉवेलला त्याने जीवदान दिले. हे पाहून भारताचे फिल्डिंग कोच नाराज दिसले. अर्शदीपने १९ व्या षटकात फक्त ५ धावा दिल्या आणि त्याच्या चार षटकांत विंडीजने ४३ धावा कुटल्या. २०व्या षटकात जस्सीचा पहिलाच चेंडू होल्डरने प्रेक्षकांमध्ये भिरकावला. त्यानंतर जस्सीने पुढील दोन चेंडू भन्नाट यॉर्कर टाकले. पण, पुढील यॉर्करवर पॉवेलने चौकार खेचला. पॉवेल १९ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ३४ धावांवर नाबाद राहिला, तर होल्डरनेही २२ चेंडूंत २ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ३७ धावा केल्या. विंडीजने ४ बाद १९५ धावांचा डोंगर उभा केला. या जोडीने ३५ चेंडूंत ७६ धावांची भागीदारी केली,

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.