'बंड' विषयावर लघुकथा स्पर्धेचे आयोजन
esakal March 02, 2026 02:45 AM

‘बंड’ विषयावर लघुकथा स्पर्धेचे आयोजन; ‘उत्तरदायित्व’ विशेष अंकासाठी संधी
मालाड, ता. १ (बातमीदार) : उत्तरदायित्व फाउंडेशन यांच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ‘उत्तरदायित्व’ वार्षिक अंक २०२६ प्रकाशित करण्यात येणार असून, या विशेष अंकासाठी ‘बंड’ या विषयावर आधारित लघुकथा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेसाठी कथांची शब्दमर्यादा ३०० ते ४०० शब्द इतकी निश्चित करण्यात आली आहे. कथा पूर्णपणे स्वलिखित असावी, तसेच लेखकाने त्याबाबत स्वाक्षरीसह प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. इच्छुक लेखकांनी आपली कथा १५ मार्चपर्यंत प्लॉट क्रमांक ५-१, १ बी-९, चित्रा सोसायटी, नागरी निवारा परिषद, गोरेगाव पूर्व, मुंबई -४०००६५ या पत्त्यावर पाठवावी, असे आवाहन कार्यकारी संपादक शंकर बळी यांनी केले आहे.
या स्पर्धेत निवड झालेल्या सर्वोत्कृष्ट पाच कथांना पारितोषिके देण्यात येणार असून, त्या कथांना ‘उत्तरदायित्व’च्या विशेष अंकात स्थान दिले जाणार आहे. स्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळाल्यास निवडक कथांचे स्वतंत्र पुस्तक प्रकाशित करण्यात येईल, अशी माहिती फाउंडेशनचे रमेश मोहिते यांनी दिली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.