टी20 वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाने जबरदस्त कामगिरी केली आहे. सुपर 8 फेरीत टीम इंडियाने एकच सामना गमावला. या व्यतिरिक्त टीम इंडियाची कामगिरी जबरदस्त राहिली आहे. आता उपांत्य फेरीत भारतासमोर इंग्लंडचं आव्हान आहे. असं असताना टी20 वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाला एक अडचण वारंवार जाणवत आहे. वेगवान गोलंदाजांचा फॉर्म आणि फिटनेसमुळे टीम इंडिया चिंतेत आहे. जसप्रीत बुमराह वगळता एकही वेगवान गोलंदाज साजेशी कामगिरी करताना दिसत नाही. त्यामुळे जसप्रीत बुमराहची जागा पुढे जाऊन कोणी घेईल? अशी स्थिती नाही. त्यामुळे बीसीसीआयने ही अडचण दूर करण्यासाठी पाऊल उचललं आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धा संपण्याआधीच माजी वेगवान गोलंदाज जहीर खानची मदत मागितली आहे. तसेच त्याच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.
रिपोर्टनुसार, या महिन्यात बंगळुरूच्या सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये खास सराव शिबीर लागणार आहे. या सराव शिबिरात देशातील टॉप वेगवान गोलंदाज हजेरी लावतील. त्यांना झहीर खान ट्रेनिंग देणार आहे. सध्या सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये कोणताही फास्ट बॉलिंग कोच नाही. ट्रॉय कूली यांनी निवृत्ती घेतल्यानंतर ही जागा रिक्त आहे. आता ही जागा झहीर खान घेणार आहे. सीईओचे क्रिकेट प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मणला झहीर खानला या भूमिकेत पाहायचं आहे. खरं तर झहीर खानलाही प्रशिक्षणात रस आहे. आयपीएल स्पर्धेत त्याने मुंबई इंडियन्ससोबत काम केलं आहे. त्यानंतर लखनौ सुपर जायंट्सच्या ताफ्यातही रूजू झाला होता. आता टीम इंडियासाठी वेगवान गोलंदाजांचा ताफा तयार करण्याचा विचार आहे.
झहीर खान 47 वर्षांचा असून भारतासाठी 92 कसोटी सामन्यात 311 विकेट घेतल्या आहेत. तसेच 200 वनडे सामन्यात 282 विकेट घेतल्या आहेत. इतकंच काय तर टी20 सामन्यात 17 विकेट घेतल्या आहेत. वनडे वर्ल्डकप 2011 विजयात झहीर खानचा मोलाचं सहकार्य होतं. इतकंच काय आयपीएलच्या 100 सामन्यात 102 विकेट घेतल्या आहे. त्यामुळे झहीर खानचा अनुभव पाहता बीसीसीआयला वेगवान गोलंदाज घडवण्यात मोलाचं सहकार्य लाभणार यात काही शंका नाही.