'निसर्ग किमया' काव्यसंग्रहाचे दिमाखात प्रकाशन
esakal March 04, 2026 08:45 AM

‘निसर्ग किमया’ काव्यसंग्रहाचे दिमाखात प्रकाशन
शब्दालंकारांनी कवितेचे खरे सौंदर्य खुलते ः कवयित्री स्नेहा पंडित

वसई, ता. ३ (बातमीदार) : ‘निसर्ग म्हणजे शाश्वत चमत्कार आहे. निसर्गात रमणाऱ्या भाबड्या जीवाचा आत्माच कवितेत उतरतो. शब्दालंकारांनी कवितेचे खरे सौंदर्य खुलते,’ असे प्रतिपादन कवयित्री स्नेहा संदीप पंडित यांनी केले.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त वसई माणिकपूर येथील समाज उन्नती सभागृहात साहित्य जल्लोष प्रतिष्ठान तसेच समाज उन्नती मंडळ संचलित मनोहर वाचनालय विभागाच्या वतीने ‘जागर मराठी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी स्नेहा पंडित यांच्या ‘निसर्ग किमया’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन दूरदर्शन सह्याद्री वाहिनीच्या वृत्तनिवेदिका दीपाली केळकर यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाला उपमहापौर
साहित्यिक अँड्र्यू कोलासो, स्थायी समितीचे माजी सभापती संदेश जाधव, फा. ज्यो आल्मेडा, डिंपल पब्लिकेशनचे अशोक मुळे, इस्राईल येथील यार्देना सानकर, नगरसेवक कल्पेश मानकर, अजय रॉड्रिग्ज, नगरसेविका पुष्पा जाधव, प्रमिला पाटील, सुवर्ण पाटील, मार्शलीन चाको, व्रजेश सोलंकी, मुस्कान चुहीकर आदी मान्यवर तसेच साहित्यिक, कवी आणि वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कविता सादर करताना स्नेहा पंडित यांनी ‘पर्यावरण’ या विषयाला अधोरेखित करत समाजातील ज्वलंत प्रश्न ‘निसर्ग किमया’ या काव्यसंग्रहातून प्रभावीपणे मांडले असल्याचे सांगितले.
या वेळी व्रजेश सोलंकी यांनी मराठी माध्यमातून शिक्षण घेतल्याचा अभिमान व्यक्त केला. घरी गुजराती भाषा बोलली जात असली तरी संपूर्ण शिक्षण आणि साहित्यलेखन मराठीतच केले, असे ते म्हणाले. फा. ज्यो आल्मेडा यांनी आगाशीतील मराठमोळ्या वातावरणात वाढल्याचे सांगत मराठी पुस्तके आणि खाद्यसंस्कृतीबद्दल आपुलकी व्यक्त केली. मुस्कान चुहीकर यांनीही मराठी भाषेत कविता लेखन व सादरीकरण करत असल्याचे सांगितले. माझे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून, पुरणपोळी आणि वडापाव हे पदार्थ विशेष आवडतात, असे त्या म्हणाल्या.
‘जागर मराठी’ कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदेश जाधव यांनी केले. विशेष म्हणजे इस्राईल येथील यार्देना सानकर यांनी मराठी भाषेतील आपले प्रेम व्यक्त करत, हिब्रू ही आमची मातृभाषा असली तरी वडिलांनी लहानपणापासून मराठी वाचनाची सवय लावल्यामुळे आज मी मराठीत संवाद साधू शकते, असे सांगितले. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ‘निसर्ग किमया’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन दिमाखात पार पडले.

वसई : ‘जागर मराठी’ कार्यक्रमात स्नेहा पंडित यांच्या ‘निसर्ग किमया’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.