कल्याण-डोंबिवलीत ‘महास्वच्छता मोहीम’
६४ टनांहून अधिक कचरा संकलित; महापालिका आणि नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अभियान
कल्याण, ता. ३ (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महापालिका आणि महाराष्ट्रभूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आज (ता. ३) संपूर्ण शहर परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत लोकप्रतिनिधी, पालिका प्रशासन, पोलिस दल आणि श्री सदस्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत शहराचा कायापालट केला. महापौर हर्षाली चौधरी, आयुक्त अभिनव गोयल, उपायुक्त (घनकचरा) रामदास कोकरे आणि शहरप्रमुख रवि पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात प्रत्यक्ष साफसफाई केली. उपमहापौर राहुल दामले व पालिका सदस्यांनी महापालिका कार्यालय परिसरात मोहीम फत्ते केली.
पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांच्यासह १०० पोलिस कर्मचाऱ्यांनीही या सामाजिक कार्यात श्रमदान केले. तसेच आमदार राजेश मोरे, सुलभा गायकवाड आणि विविध प्रभागांतील सदस्यांनी आपापल्या भागात मोहिमेचे नेतृत्व केले. या मोहिमेदरम्यान शहरातील मुख्य रस्ते, चौक आणि गल्ल्यांमधील धूळ व कचरा हटवून घंटागाड्या आणि डम्परद्वारे कचरा संकलित करण्यात आला.
लोकसहभागाचे विराट दर्शन
मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रतिष्ठानचे जवळपास ४,००० श्री सदस्य आणि महापालिकेचे १,००० कर्मचाऱ्यांनी खांद्याला खांदा लावून काम केले. आपले शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवणे ही केवळ प्रशासनाची नाही, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. नागरिकांनी कचऱ्याचे वर्गीकरण करून पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन महापौर हर्षाली चौधरी आणि आयुक्त अभिनव गोयल यांनी या वेळी केले.
मोहिमेचे यश
कचरा प्रकार संकलित वजन (किलोमध्ये)
ओला कचरा १७,५८० किलो
सुका कचरा ४६,९९६ किलो
एकूण कचरा ६४,५७६ किलो (सुमारे ६४.५ टन)