मंचर, ता. ३ : भोरवाडी -अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथे शिव सम्राट युवा प्रतिष्ठान यांच्यावतीने शिवशंभो मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन १० मे (रविवारी) यादिवशी करण्यात आले आहे. यंदा या उपक्रमाचे १६ वे वर्ष असून वधू-वरांनी मोठ्या संख्येने नोंदणी करावी, असे आवाहन शिव सम्राटप्रतिष्ठानचे सचिव विकास भोर व उपसरपंच प्रवीण भोर यांनी केले आहे.
सहकार महर्षी माजी आमदार स्व. दत्तात्रेय गोविंदराव वळसे पाटील यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून हा विवाह सोहळा आयोजित करण्यात येत असून, गेली १६ वर्षे हा सामाजिक उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहे. आतापर्यंत २०५ विवाह येथील सोहळ्यात झाले आहेत.
सामुदायिक विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक नववधूस शासनाच्या योजनेअंतर्गत २५ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. सोहळ्यासाठी प्रशस्त मंडप उभारण्यात येणार असून सर्व वऱ्हाडींसाठी भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती स्वप्निल भोर यांनी दिली.
विवाह सोहळ्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या वधू-वरांनी नोंदणीसाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण भोर +(मोबाईलक्र. ९९६०५११७१७) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.