'एसटीपी', क्लब हाऊसचे चुकून पालिकेला हस्तांतरण
esakal March 04, 2026 09:45 AM

जाधववाडी, ता.३ ः पेठ क्र.१२ मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेतील ४५ सहकारी गृहरचना संस्थांसाठी बांधण्यात आलेला मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प (एसटीपी) आणि गृहप्रकल्पातील क्लब हाऊसचे पीएमआरडीएकडून महापालिकेला चुकीने हस्तांतरण झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) पेठ क्र.१२ मधील प्रधानमंत्री आवास योजना गृहप्रकल्पातील मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प वर्षभरापासून बंद अवस्थेत आहे. तसेच रहिवाशांना क्लब हाऊसही वापरण्यात अडचणी येत आहेत. त्याबाबत चिखली- मोशी - पिंपरी चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशनच्या शिष्टमंडळाने पीएमआरडीएचे आयुक्त डॉ.योगेश म्हसे यांच्यासमवेत बैठक घेतली.
प्राधिकरणाने चुकीच्या पद्धतीने क्लब हाऊस, एसटीपी महानगरपालिकेकडे हस्तांतरित केल्याने सोसायटीधारकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाल्याची फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ. म्हसे यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच बंद ‘एसटीपी’मुळे दुर्गंधी पसरत असल्याचे नमूद करण्यात आले. त्यावर चुकीच्या पद्धतीने केलेले हस्तांतरण मागे घेतले जाईल आणि ते संबंधित गृहप्रकल्पाला परत हस्तांतरित केले जाईल. तसेच बंद ‘एसटीपी’ प्रकल्प त्वरित चालू करण्याचे आदेश देण्यात येतील. पुढील आठ ते दहा दिवसांत याबाबत परत बैठक घेऊन प्रकल्प हस्तांतरित होईल, असे डॉ. म्हसे यांनी बैठकीत स्पष्ट केले. याशिवाय, पेठ क्र.१२ मधील धूळ आणि राडारोडा दूर करून रस्ता लवकर चालू करण्याचेही आदेश आयुक्तांनी दिले.


पेठ क्र. १२ मधील प्रधानमंत्री आवास योजना प्रकल्पामधील क्लब हाऊस, मैला शुद्धीकरण प्रकल्प आणि पाणी व्यवस्थापनासंदर्भातील समस्यांमुळे नागरिकांवर प्रतिकूल परिणाम होत आहे. पीएमआरडीए आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी दिलेल्या स्पष्ट आश्वासनामुळे सोसायटीधारकांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे.
- संजीवन सांगळे, अध्यक्ष, चिखली-मोशी, पिंपरी चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशन

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.