ढोकाळीत गोडाऊनला आग; दोन तासांनी आगीवर नियंत्रण
esakal March 04, 2026 01:45 PM

ढोकाळीत गोडाऊनला आग; दोन तासांनी आगीवर नियंत्रण
मशिनरीसह मोठे नुकसान, सुदैवाने जीवितहानी नाही
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३ : ढोकाळी परिसरातील कोलशेत रोडवरील मोहन मिल कंपाउंडमधील एका गोडाऊनला सोमवारी (ता. २) रात्री आग लागल्याची घटना समोर आली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून, गोडाऊनमधील मशिनरी व साहित्य जळून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्या आगीवर तब्बल दोन तासांनी नियंत्रण मिळविण्यात यश आले.
कोलशेत रोड येथील मोहन मिल कंपाउंडमधील ‘श्रुती इंजिनिअर्स वर्क्स’ या गोडाऊनमध्ये रात्री आग लागल्याची माहिती सुनील रावत नामक दक्ष नागरिकाने आपत्ती व्यवस्थापन कक्षेला दिली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षेच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेत, संयुक्तपणे त्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. त्यानंतर त्या आगीवर जवळपास दोन तासांनी पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यात यश आले. गोडाऊनमध्ये आग लागली तेव्हा हे गोडाऊन बंद होते. ते गोडाऊन अंदाजे ९०० स्क्वेअर फूट क्षेत्रफळाचे असून, त्याचे मालक श्रेयस मामुनकर आहेत. त्या गोडाऊनमध्ये मेटल पार्ट कट करण्यासाठी वापरण्यात येणारी मशिनरी ठेवण्यात आली होती. त्या आगीमुळे गोडाऊनमधील सर्व मशिनरी, फर्निचर व इतर साहित्य पूर्णतः जळून खाक झाले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.