तळेगाव दाभाडे, ता. ३ : नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्यावतीने ‘निर्भय कन्या अभियान’ अंतर्गत विद्यार्थिनींसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले.
या कार्यक्रमात ‘डायट अॅण्ड फिटनेस’ या विषयावर तज्ज्ञ व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी आहारतज्ज्ञ डॉ. रोशनी सोलंकी उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थिनींना योग्य आहार, आरोग्यदायी जीवनशैली आणि नियमित व्यायामाचे महत्त्व समजावून सांगितले. विशेषतः अॅनिमिया म्हणजे काय, त्याची लक्षणे व त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
किशोरवयीन मुलींसाठी लोहयुक्त आहार, संतुलित पोषण, हिरव्या पालेभाज्यांचे सेवन तसेच पुरेशा प्रमाणात पाणी पिण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. यासोबतच मानसिक आरोग्य, ताण-तणाव व्यवस्थापन आणि सकारात्मक जीवनदृष्टी याबाबतही त्यांनी सूचना दिल्या. व्याख्यानादरम्यान विद्यार्थिनींनी विविध प्रश्न विचारून शंकानिरसन करून घेतले.
कार्यक्रमाचे नियोजन विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. जावेद शेख यांनी केले. यावेळी अभियांत्रिकीचे संचालक डॉ. प्रमोद पाटील तसेच डॉ. नीता कराडकर उपस्थित होत्या. अभियांत्रिकीच्या कार्यकारी समितीचे चेअरमन राजेश म्हस्के यांनी अभियानाचे कौतुक करून भविष्यातही असे उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त केला.