आक्रमक पवित्र्यानंतर मनसेच्या अटी ठाकरे सेनेकडून मान्य,  संजय राऊत-राज ठाकरेंच्या भेटीनंतर मोठ्या घडामोडी
वेदांत नेब March 04, 2026 06:43 PM

मुंबई : महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक आणि प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदावरून ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये खटके उडाल्याच्या बातम्या येत होत्या. आता त्यावर पडदा पडल्याचं दिसतंय. मनसेच्या आक्रमक पवित्र्यानंतर ठाकरे सेनेने त्यांच्या अटी मान्य केल्याची माहिती आहे. ठाकरेंच्या सेनेकडून मनसेला अधिकची प्रभाग समिती देण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिकेत तटस्थ राहण्याचा निर्णय घेतलेल्या मनसेने आता माघार घेतल्याची माहिती आहे.

महापालिका निवडणूक एकत्र लढलेल्या मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये स्वीकृत नगरसेवक आणि प्रभाग समितीवरून वाद झाल्याचं दिसून आलं होतं. ठाकरेंच्या सेनेच्या वाट्याला येणाऱ्या नगरसेवकांपैकी एक जागा मनसेला मिळावी अशी मागणी होती. परंतु त्या बदल्यात ठाकरे सेनेकडून मनसेला प्रभाग समिती देण्याचं ठरलं होतं.

राज ठाकरे-संजय राऊतांची भेट  

मात्र ठाकरेंच्या सेनेकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने प्रभाग समिती निवडणुकीत मनसे तटस्थ राहणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. यानंतर संजय राऊतांनी शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली. या दोघांमध्ये 25 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती आहे.

राज ठाकरे आणि संजय राऊत यांच्या भेटीनंतर शिवसेनेचे आमदार वरुण सरदेसाई आणि मनसेचे यशवंत किल्लेदार, संदीप देशपांडे यांच्यात चर्चा झाली. या चर्चेमध्ये ठाकरेंच्या सेनेकडून मनसेला अधिकची प्रभाग समिती देण्याचा निर्णय झाल्याची माहिती आहे.

मनसेला मिळणाऱ्या प्रभाग समित्या -

  • जी नॉर्थ 2 वर्षे
  • एफ साऊथ 1 वर्ष
  • पी पूर्व पश्चिम 1 वर्ष
  • एस आणि टी 1 वर्ष

यापैकी जी नॉर्थ ही प्रभाग समिती 2 वर्षांसाठी मनसेला मिळाली. मनसेला स्वीकृत नगरसेवक पद ठाकरे गटाने दिले नाही. त्याबदल्यात मनसेने वाटाघाटीत जी नॉर्थ प्रभाग समिती 2 वर्षांसाठी मिळवली.

सर्वच ठिकाणी एकत्र, सरदेसाईंचा विश्वास

वरुण सरदेसाई म्हणाले की, मनसेच्या नेत्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली. मुंबई मनपा निवडणुका आम्ही एकत्र लढलो होतो. आता पुढचं कामकाज एकत्र करावं ही इच्छा होती. प्रभाग समितीची निवडणूक आहे, दोन्ही पक्ष एकत्र असले तर चांगलं होईल आणि तसाच निर्णय झाला आहे. एखाद्या प्रभाग समितीची काय परिस्थिती असावी यापेक्षा एकजूट महत्वाची आहे.

मुंबईत आम्हाला हवं तसं यश मिळालं नसलं तरी मुंबईकरांनी प्रेम दिलं. आम्ही सर्वच ठिकाणी एकत्र आहोत. काही समितीचे अध्यक्षपद हे काँग्रेस, ठाकरे गट आणि मनसेत वाटली जातील. तसं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना कळवलं आहे.

वेगळी भूमिका नाही

मनसेचे नेते संदीप देशपांडे यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, "सेना-मनसेच्या बैठकीत प्रभाग समितीवर चर्चा झाली. कोण कोणता वॉर्ड घेणार यावर सकारात्मक चर्चा झाली. सगळे विषय माध्यमासमोर बोलता येत नाहीत. आम्ही कोणतीही वेगळी भूमिका घेतली नव्हती. आता आमची शेवटची चर्चा झाली असून उद्या निर्णय कळवू."

मुंबई महापालिका संख्याबळ - (BMC Election Result 2026)

    • भाजप - 89
    • शिवसेना ठाकरे गट - 65
    • शिवसेना शिंदे - 29 
    • काँग्रेस - 24
    • मनसे - 6 
    • एमआयएम- 8 
    • एनसीपी - 3 
    • समाजवादी पार्टी - 2 
    • राष्ट्रवादी शरद पवार - 1 

ही बातमी वाचा:

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.