28188
निकृष्ट कामाची नगराध्यक्षकांडून पोलखोल
मुंबई- गोवा महामार्ग ः अपूर्ण कामे पूर्ण करण्याचे पारकरांचे निर्देश
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ३ : कणकवली शहरातून जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गाच्या डांबरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी नगराध्यक्षांकडे केल्या होत्या. त्याअनुषंगाने नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी सोमवारी रात्री डांबरीकरणाची पाहणी केली. यावेळी कमी जाडीचा थर वापरून डांबरीकरण केले जात असल्याचे लक्षात येताच श्री. पारकर यांनी महामार्ग अधिकाऱ्यांना खडसावले. चांगल्या दर्जाचे डांबरीकरण करा तसेच महामार्गालगतची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करा, असेही निर्देश त्यांनी महामार्ग अधिकाऱ्यांना दिले.
शहरातील उड्डाणपुलाखालील सेवारस्ता दुतर्फा डांबरीकरणाचे काम रात्री दहानंतर सुरू केले जाते. मात्र, हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर नगराध्यक्ष श्री.पारकर यांनी या डांबरीकरणाची पाहणी केली. त्यामुळे रस्त्यावरील धूळ, माती साफ न करताच डांबरीकरण केले जात असल्याची बाब निदर्शनास आली. जेथे वारंवार खड्डे पडतात. तेथील खड्डे योग्य रित्या न बुजवताच डांबरीकरणाचा थर ओतला जात होता. ही बाब लक्षात येताच श्री.पारकर यांनी महामार्ग अधिकारी आणि डांबरीकरण करणाऱ्या कंपनीच्या ठेकेदाराला चांगले सुनावले. ‘डांबरीकरण दर्जेदार झालेच पाहिजे. किमान वर्षभर तरी एकही खड्डा पडता कामा नये,’ असे निर्देश श्री.पारकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या हायवे प्राधिकरणाचे व्यवस्थापक भूपेंद्र चौधरी यांनी तीन दिवसांत काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. यावेळी कंपनीचे अभियंता रवींद्र गायकवाड, अमेय पारकर, सोहम वाळके, बाबू केणी, गौरव हर्णे आदी उपस्थित होते.
---
इतर समस्यांचीही दखल
रस्त्यालगतची गटारे अर्धवट असल्याने पाणी साचून दुर्गंधी पसरत असल्याचे निदर्शनास आणून देत त्यांनी तातडीने निचऱ्याची व्यवस्था करण्याचे आणि गटारे स्वच्छ करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. गोकुळधाम येथील ॲड. उमेश सावंत यांच्या घरालगतचे गटार तत्काळ स्वच्छ करावे. सेवा रस्त्यावरील बंद पथदीप सुरू करून जीर्ण दिवे बदलावेत. उड्डाणपुलाखालील तुटलेली रेलिंग दुरुस्त करून परिसर सुरक्षित करावा, असेही निर्देश श्री. पारकर यांनी दिले.