Sanjay Raut : एपस्टीन फाईल्सवरुन लक्ष वळवण्यासाठी युद्धाचा बार उडवला, संजय राऊत यांचा सनसनाटी दावा
Tv9 Marathi March 04, 2026 08:45 PM

“ही जागा मविआची आहे. मविआ एकत्र असेल तेव्हा ही जागा निवडून येईल. शिवसेना हा विधिमंडळात मविआमधला सर्वात मोठा पक्ष आहे. आमचे 20 आमदार आहेत. 16 काँग्रेसचे आहेत, 10 शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. आम्ही जेव्हा एकत्र राहू तेव्हा एक जागा निवडून येईल. एकत्र राहणं गरजेच आहे. उद्या उमेदवारी अर्ज भरण्याचा 5 मार्च महत्वाचा दिवस आहे. काल नक्कीच जयंत पाटील, सुप्रिया सुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटल्या. त्यांच्यात चर्चा झाली. आज संध्याकाळपर्यंत निर्णय जाहीर होईल” असं संजय राऊत राज्यसभा निवडणुकीबाबत म्हणाले. “कोणताही एक पक्ष या संदर्भात निर्णय जाहीर करु शकत नाही. कारण आघाडी आहे. जागा कोणी लढायची हा आघाडी म्हणून जाहीर केला जाईल. आम्ही काही सांगितलं तर काँग्रेस पक्ष नाराज होईल. काँग्रेसने परस्पर काही निर्णय घेतला तर आम्ही विचारु तुम्ही कसं जाहीर करता. उद्धव ठाकरे यांना भेटून जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांनी सविस्तर चर्चा केली. निर्णय जाहीर करणं कुठल्या एकापक्षाच्या हातात नाही. ते तीन पक्ष एकत्र येऊन त्या संदर्भात अंतिम निर्णय होईल. मग तो निर्णय जाहीर होईल” असं संजय राऊत म्हणाले.

“दिल्लीतल्या काँग्रेस नेत्यांनी शिवसेनापक्ष प्रमुखांशी चर्चा केली. राष्ट्रवादीच्या दोन प्रमुख नेत्यांनी शिवसेना पक्षप्रमुखांशी चर्चा केली. तिन्ही पक्षामध्ये चर्चा, संवाद सुरु आहे. तो संपलेला नाही. जे काही होईल ते एकमताने होईल. तीन पक्ष तीन स्वतंत्र उमेदवार उभे करु शकत नाही. सातवी जागा मविआ म्हणून जिंकू” असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

‘आपलं परराष्ट्र धोरण माती खातय’

“एक लक्षात घ्या जेव्हा एखाद्या देशाच्या राष्ट्र प्रमुखाची हत्या होते. तो प्रदीर्घकाळ त्या देशाचं नेतृत्व करतोय. तो कोणताही देश असेल तो देश परंपरेने हिंदुस्थानाचा मित्र आहे. अशावेळी त्या नेत्याच्या हत्येबाबत, मृत्यूबाबत शोक व्यक्त करणं हा एक शिष्टाचार आहे. तो शिष्टाचार पाळणं गरजेच आहे. पंतप्रधान नेतन्याहूंना, जॉर्डनच्या राजाला फोन करतात सौदी अरेबिया, कुवेत, बहरीन यांना फोन करतात. पण ज्या देशावर सर्वात मोठ संकट आहे, ज्या देशावर हल्ला झाला आहे. त्यांचे सुप्रीम लीडर मारले गेलेत. त्यांना फोन करणं त्यांना शोक संवेदना व्यक्त करणं याला आम्ही शिष्टाचार मानतो. पाकिस्तानचे पंतप्रधान, राष्ट्रपती यांच्या अनेकदा हत्या झाल्या, मृत्यू झाले. ते आपलं शत्रू राष्ट्र आहे. तरीही त्या राष्ट्रात अशा दुर्घटना घडल्यावर या देशाच्या पंतप्रधानांनी दु:ख व्यक्त केलेल आहे. हा एक शिष्टाचार आहे. तो शिष्टाचार पाळत नसू तर आपलं परराष्ट्र धोरण माती खातय” असं संजय राऊत म्हणाले.

एपस्टीन फाईल्सवर संजय राऊत काय म्हणाले?

प्रकाश आंबेडकरांनी मोदींना इशारा दिलाय एप्रिलपर्यंत थांबा तुमच्या दोन फाईल्स आम्ही बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. त्यावर संजय राऊत बोलले. “प्रकाश आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत. त्यांचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन्स अधिक महत्वाचे असतील. जसे पृथ्वीराज चव्हाण आमचे आहेत, त्यांनी सुरुवातीला एपस्टीन फाईल्सची माहिती दिली. तेव्हा देशाला माहित नव्हतं एपस्टीन फाईल्स काय आहे?. त्यावेळेला पृथ्वीराज चव्हाण यांनी देशाला, महाराष्ट्राला अवगत करुन दिलं, अशा प्रकारच्या फाईल्स उघडल्या जातील. त्यात आपल्या देशाच्या नेत्याची नाव असतील सरकार अडचणीत येईल. हे जे युद्ध पुकारलेलं आहे आहे अमेरिकेने इराणविरुद्ध. माझ्या माहितीप्रमाणे घाईघाईने युद्ध करण्यामागचे एपस्टीने फाईल्सवरच्या लोकांच्या चर्चा बंद व्हाव्यात. त्यातून गंभीर माहिती पुढे येत आहे. यावरचं लक्ष उडावं, युद्धावर चर्चा करावी. एपस्टीन फाईल्स विसरुन जावं, म्हणून काही राष्ट्रप्रमुखांनी एकत्र येऊन युद्धाचा बार उडवला हे स्पष्ट दिसतय” असा दावा संजय राऊत यांनी केला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.