IND vs ENG Semi final: इंग्लंडला भारताच्या या खेळाडूची धास्ती, सॅम करनने बोलून मन केलं मोकळं
Tv9 Marathi March 04, 2026 08:45 PM

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचा थरार आता अंतिम टप्प्यात आला आहे. उपांत्य फेरीच्या लढती होणार असून जेतेपदासाठी दोन संघ ठरणार आहेत. भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. या सामन्यातील विजेत्या संघाला अंतिम फेरीचं तिकीट मिळणार आहे. असं असताना या सामन्यापूर्वी इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम करनचं मोठं विधान समोर आलं आहे. अष्टपैलू सॅम करनने भारताची सलामीवीर अभिषेक शर्माबाबत भीती व्यक्त केली आहे. कारण अभिषेक शर्माची बॅट एकदा चालली तर गोलंदाजांचं काय खरं नाही. त्यामुळे त्याने आपल्या संघ सहकाऱ्यांना अलर्ट केलं आहे. सॅम करनने सांगितलं की, अभिषेक शर्माच्या धोक्याची चांगल्या प्रकारे जाणीव आहे. आशा आहे की, तो आक्रमक खेळी करणार नाही. तसं पाहिलं तर अभिषेक शर्मा टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पूर्णपणे फेल गेला आहे. त्याला तीन सामन्यात खातंही खोलता आलं नाही. तरीही मागचा रेकॉर्ड पाहता त्याची दहशत खेळाडूंच्या मनात आहे.

इंग्लंडला का वाटतेय अभिषेक शर्माची भीती?

टी20 आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अभिषेक शर्मासोबत इंग्लंडचा शेवटचा सामना वानखेडेवरच झाला होता. या सामन्यात अभिषेक शर्माने इंग्लंडच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं होतं. त्याने 54 चेंडूत 135 धावांची वादळी खेळी केली होती. यात 13 षटकार आणि 7 चौकार मारले होते. या सामन्यात भारताने इंग्लंडला 150 धावांनी पराभूत केलं होतं. टी20 इतिहासात इंग्लंडचा हा सर्वात मोठा पराभव आहे. सॅम करनने सांगितलं की, ‘मी आशा करतो की अभिषेक शर्मा पुन्हा तशी खेळी करणार नाही. पण आम्ही या सामन्यासाठी पूर्णपणे तयार आहोत. आमचं पूर्ण लक्ष्य गुरूवारच्या रात्रीवर असेल.’

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत अभिषेक शर्माची खेळी काही खास राहिली नाही. त्याच्या फलंदाजीला ग्रहण लागलं असंच म्हणावं लागेल. या स्पर्धेतील पहिला सामना वानखेडे स्टेडियमवर अमेरिकेविरूद्ध खेळला होता. मात्र या सामन्यात खातं खोलता आलं नाही. त्यानंतर सलग तीन वेळा शून्यावर बाद होण्याचा नकोसा विक्रम केला. त्याने झिम्बाब्वेविरुद्ध 55 धावांची खेळी केली. तर दक्षिण अफ्रिकेविरुद्ध 15 आणि वेस्ट इंडिजविरुद्ध 10 धावा करून बाद झाला. त्याने या स्पर्धेत एकूण 80 दावा केल्या आहेत. तरीही त्याची धास्ती इंग्लंडने घेतली आहे. कारण अभिषेक शर्मा कधीही सामन्याची स्थिती बदलू शकतो.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.