तरुणाचा एक्सप्रेसमध्ये मोबाईल चोरीला
esakal March 06, 2026 04:45 PM

पोलिस भरतीसाठी आलेल्या तरुणाचा एक्स्प्रेसमध्ये मोबाईल चोरीला

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. ५ : पोलिस भरतीच्या मैदानी चाचणीसाठी मुंबईत आलेल्या तरुणाचा नंदीग्राम एक्स्प्रेसमध्ये मोबाईल चोरीला गेल्याचा प्रकार ठाण्यात घडला आहे. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली येथील शिवशंकर सुभाष राठोड (वय २३) हा तरुण पोलिस भरतीच्या मैदानी चाचणीसाठी मुंबई येथे आला होता. सोमवारी (ता. २) तो छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावरून नंदिग्राम एक्स्प्रेसने मुंबईकडे निघाला होता. गाडीच्या बोगी क्रमांक ५-६ मधील आसन क्रमांक ३७ वर त्याचे आरक्षण होते. मंगळवारी (ता.३) पहाटे सुमारे ४.४५ वाजता गाडी कल्याण रेल्वे स्थानकावर थांबून पुढे निघाल्यानंतर त्याला झोप लागली. दरम्यान, पहाटे सुमारे ५.१० वाजता गाडी ठाणे रेल्वे स्थानकावर आल्यावर त्याला जाग आली. त्या वेळी त्याने पँटच्या उजव्या खिशात ठेवलेला मोबाईल फोन तपासला असता तो आढळून आला नाही. त्याने डब्यात आणि आसपास त्याचा शोध घेतला; मात्र त्याला मोबाईल सापडला नाही. झोपेचा फायदा घेत अनोळखी व्यक्तीने मोबाईल चोरी केला. त्याची किंमत सुमारे २० हजार १०० रुपये आहे. पोलिस भरतीची मैदानी चाचणी दिल्यानंतर ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात धाव घेत, शिवशंकरने तक्रार दाखल केली. याप्रकरणी पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.