महाराष्ट्र तापला! मार्चच्या पहिल्या आठवड्यातच तापमानाच्या पाऱ्यानं गाठला उच्चांक, अकोल्यात 40 अंशाची नोंद 
एबीपी माझा ब्युरो March 06, 2026 10:43 PM

Maharashtra Temperature News :   दिवसेंदिवस राज्यात उन्हाचा चटका वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. वाढत्या उन्हाचा लोकांना मोठा त्रास होत आहे. राज्याच्या विविध भागात तापमानाचा पारा 35  अंशाच्या पुढे गेल्याचं पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी तापमानाचा पारा 40 अंशावर गेल्याचं दिसत आहे. आज अकोल्यात मार्चच्या पहिल्याच आठवड्यात तापमानाने उच्चांक गाठला आहे. तापमानाचा पारा 40.7 अंशावर गेला आहे. 

विदर्भात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढताना दिसत  आहे

विदर्भात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढताना दिसत असून अकोला शहरात मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात तापमानाने उच्चांक गाठला आहे. आज, 6 मार्च रोजी अकोल्यातील कमाल तापमान तब्बल 40.7 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले आहे. त्यामुळं अकोलेकरांना मार्चच्या सुरुवातीलाच कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळं दुपारच्या सुमारास रस्त्यांवरची वर्दळ कमी झालेली दिसून येत असून उष्णतेमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

सोलापुरात देखील उन्हाचा चटका वाढला, तापमानाचा पारा 39.5 अंशावर

सोलापुरात देखील उन्हाचा चटका वाढला आहे. सोलापुरात आज तब्ब्ल 39.5 अंश से तापमानाची नोंद झाली आहे.  मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सोलापुराचा पारा 40 अंश से दिशेने गेला आहे. मागील तीन दिवसापासून उन्हाचा पारा सलग 38 अंश से च्या पार आहे. 

राज्यात तापमानाचा पारा वाढल्यानं नागरिकांना त्रास

राज्यात उन्हाचा चटका वाढत आहे. तापमानात वाढ झाल्याने दुपारी उकाडाही जाणवत आहे. कोकणात उष्ण आणि दमट हवामान होते. तर राज्यातील उन्हाचा चटका वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. त्यानुसार तापमानात वाढ होत असल्याचं चित्र दिसत आहे. कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात उष्ण आणि दमट हवामान होते. उद्याही पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज देण्यात आला आहे. तापमानात वाढ झाल्याने राज्यातील बहुतांशी भागात उन्हाचा चटकाही वाढत आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात तसेच उत्तर महाराष्ट्रातील तापमानात मागील काही दिवसांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. सलग दोन दिवस कमाल तापमान 35 पार पुण्यात झाले. गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर आणि परिसरात तापमान वाढीमुळे उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. मार्चच्या सुरुवातीलाच सलग दोन दिवस कमाल तापमानाने 35 शी ओलांडली असून पुढील काही दिवसात तापमान आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

सावधान! मुंबईसह राज्यात उन्हाचा चटका वाढला, तापमानाचा पारा 38 अंशावर, कोणत्या भागात किती तापमान?  

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.