Agricultural News : कांदा उत्पादक पुन्हा संकटात! लाल कांद्याच्या दरात मोठी घसरण; सरासरी भाव ९५० रुपयांवर
esakal March 04, 2026 08:45 PM

पंचवटी: सध्या बाजारात लाल कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक होत असल्याने दरात लक्षणीय घसरण झाल्याचे चित्र आहे. मंगळवारी झालेल्या लिलावात लाल कांद्याला किमान ३००, सरासरी ९५० तर सर्वाधिक १२०० रुपये प्रति क्विंटल असा बाजारभाव मिळाला. मागील वर्षाच्या तुलनेत दरात मोठी घट झाल्याने आणि उत्पादन खर्चही भरून न निघाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

पेठ रोडवरील शरदचंद्रजी पवार मार्केट यार्ड येथील कांदा-बटाटा विभागात दिंडोरी, वणारवाडी, तळेगाव, सिन्नर, सोनांबे-कोनांबे, शिंदे, निमगाव, ठाणगाव, पाडळी, पेठ-हरसूल, करंजली, कोल्हार आदी भागांतून कांद्याची आवक होते. मंगळवारी (ता.३) दुपारी झालेल्या लिलावात लाल कांद्याची एकूण १२८६ क्विंटल आवक झाली.

त्याचप्रमाणे बटाट्याची १३१५ क्विंटल आवक झाली असून प्रतवारीनुसार किमान ६५०, सरासरी ८०० तर सर्वाधिक १२५० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. लसणाची आवक ४५ क्विंटल झाली. प्रतवारीनुसार लसणाला किमान ४५००, सरासरी ९००० तर सर्वाधिक १०,५०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. दरम्यान, किरकोळ बाजारात कांदा १५ ते ३० रुपये, बटाटा १५ ते २५ रुपये आणि लसूण ८० ते २०० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे.

Kolhapur Zilla Parishad : बेकायदेशीर वृक्षतोड केला अन् सरपंचपद घालवून बसला, विभागीय आयुक्तांचा कोल्हापूर जिल्हा परिषदेला दिला आदेश

लसणाच्या दरातही नरमाई

सध्या बाजार समित्यांमध्ये लसणाची आवक प्रामुख्याने मध्यप्रदेश व राजस्थान येथून होत आहे. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये लसणाचा नवीन हंगाम सुरू होतो. यंदा उत्पादन अधिक झाल्याने आवक वाढली असून बाजारभावावर दबाव निर्माण झाला आहे. मागील वर्षी जानेवारी ते मार्चदरम्यान लसणाची आवक कमी असल्याने दर गगनाला भिडले होते. मात्र यंदा वाढीव उत्पादनामुळे आणि वाढलेल्या आवकेमुळे लसणाच्या दरात तुलनेने घसरण झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.