Veteran Bollywood actor Vijay Krishna passes away at 81: मनोरंजन विश्वातून एक दु:खद बातमी समोर येत आहे. देवदास चित्रपटातील ज्येष्ठ अभिनेते विजय कृष्णा यांचे निधन झाले आहे. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्याचं निधन नेमकं कोणत्या कारणामुळे झाले, हे अद्याप समोर आलेले नाही. विजय कृष्णा यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांना खरी ओळख देवदास चित्रपटात साकारलेल्या प्रमुख भूमिकेतून मिळाली होती. त्यांनी देवदास चित्रपटात शाहरुख खानच्या वडिलांची भूमिका साकारली होती. विजय यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीतील एक आदरणीय व्यक्तिमत्वाचे निधन झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. मनोरंजनसृष्टीसह त्यांच्या चाहत्यांनी शोक व्यक्त केला आहे.
ज्येष्ठ अभिनेते आणि नाट्य कलाकार विजय कृष्णा यांचे वयाच्या 81व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांनी डान्स लाइक अ मॅनसारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीत गुजारिश, पीके आणि गांधीसारख्या चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे. विजय कृष्णा यांच्या पश्चात पत्नी स्मिता कृष्णा, मुलगी बिझनेसवुमन नायरिका होळकर असा परिवार आहे. त्यांच्या निधनानंतर मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. अनेक सेलिब्रिटींनी पोस्ट शेअर करत दु:ख व्यक्त केलं आहे.
अभिनेत्री लिलेट दुबे हिनं देखील पोस्ट शेअर करत, विजय कृष्णा यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. तिनं आपली पोस्ट सोशल मीडियात शेअर केली अन् म्हटलं की, 'आमच्या थिएटर कुटुंबाचा भाग असलेले, डान्स लाइक अ मॅनचे कलाकार, आमच्या सर्वांचे लाडके विजय कृष्णा यांचं निधन झाले आहे. अत्यंत हुशार अभिनेता, आमच्या सर्वांचे ते लाडके होते. आजवरच्या अनेक आठवणी या मनाला भिडतात. विजय तुम्हाला कधीही विसरता येणार नाही. कुटुंबाला या दु:खातून सावरण्याची शक्ती मिळो, यासाठी प्रार्थना.. '. अभिनेत्रीची ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. जुही सोनी, अनुपम खेर, सबा पतौडीसारख्या दिग्गज कलाकारांनी अभिनेत्रीच्या पोस्टवर कमेंट करुन श्रद्धांजली वाहिली आहे.
View this post on Instagram
मिळालेल्या माहितीनुसार, विजय कृष्णा हे सिनेमांव्यतिरिक्त इतर क्षेत्रातही सक्रिय होते. ते गोदरेज कंपनीच्या व्यवसायांमध्ये कार्यकारी संचालक होते. 2021 साली त्यांनी वयामुळे संचालक पदावरुन निवृत्ती घेतली.