अनिकेत शिंदे यांची कृषी अधिकारीपदी निवड
esakal March 04, 2026 11:45 PM

डोर्लेवाडी, ता. ४ : बारामती येथील ग्रामसेवकाच्या मुलाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कृषी विभागाच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत पहिल्याच प्रयत्नात १५ वी रँक मिळवली आहे. अनिकेत शशिकांत शिंदे यांची उपसंचालक कृषी/एसडीओ कृषी पदावर निवड झाली आहे. त्यांच्या यशामुळे बारामतीसह माळशिरस तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे.
अनिकेत शिंदे यांचे मूळ गाव शिंदेवाडी (ता. माळशिरस) आहे. मात्र वडिलांची नोकरी व शिक्षणामुळे ते अनेक वर्षांपासून बारामतीत राहत आहेत. अनिकेतचे बालवाडी ते पाचवीपर्यंतचे शिक्षण तुकडोजी महाराज विद्यालय, दौंड येथे झाले. सहावी ते दहावीचे शिक्षण शाहू हायस्कूल, बारामती येथे पूर्ण केले. अकरावी-बारावी शिक्षण मालोजीराजे शेती विद्यालय, फलटण येथे झाले. त्यानंतर बी.एस्सी. (कृषी) पदवी कृषी महाविद्यालय, शारदानगर बारामती येथून संपादन केली.
बालवाडीमध्ये असतानाच केलेल्या छोट्याशा भाषणासाठी मिळालेले पहिले बक्षीस हेच त्यांच्या वक्तृत्व प्रवासाचे प्रारंभबिंदू ठरले. त्यानंतर विविध वक्तृत्व स्पर्धांमध्ये त्यांनी सातत्याने सहभाग घेतला. बारामतीतील नामांकित मोरोपंत, प्रतिभा व कर्मवीर करंडक स्पर्धांमध्ये त्यांनी यश संपादन केले आहे. राज्यातील विविध ठिकाणी खुल्या गटातील वक्तृत्व व निबंध स्पर्धांमध्येही त्यांनी प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवले आहेत. इयत्ता आठवीत असताना विद्या प्रतिष्ठानच्या गदिमा सभागृहात आयोजित नाट्यस्पर्धेत उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही त्यांनी पटकावला. आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत कृषी महाविद्यालयाला प्रथम क्रमांकाचा करंडक मिळवून दिला. आतापर्यंत सुमारे ६० ते ७० प्रथम-द्वितीय क्रमांकाची पारितोषिके त्यांनी मिळवली आहेत.
अनिकेत यांचे वडील ग्रामपंचायत अधिकारी असून आई गृहिणी आहेत. शासनाच्या कृषी विभागाच्या योजना प्रभावीपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा मानस अनिकेत याने व्यक्त केला. शिवाय केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेचीही तयारी करत आहेत. कृषी अधिकारी झालो असलो तरी एवढ्यावरच थांबणार नाही. वर्ग १ अधिकारी होण्याचे स्वप्न असल्याचेही अनिकेत याने सांगितले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.