नाशिक: स्वच्छ, सुंदर व हरित नाशिकची संकल्पना राबविण्यासाठी महापालिकेच्या वृक्ष व प्राधिकरण विभागाच्या वतीने आगामी आर्थिक वर्षासाठी २५ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर करण्यात आले असून, यामध्ये नवीन वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनासाठी १२.१० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
महापालिका प्रशासनाच्या वतीने आयुक्त मनीषा खत्री यांनी सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाचे ३०११ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले. अंदाजपत्रकामध्ये वृक्ष व प्राधिकरण समितीसाठी स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे. २५ कोटी पाच लाख रुपयांच्या अंदाजपत्रकामध्ये ३.५३ कोटी रुपयांची तरतूद वृक्षसंवर्धनासाठी करण्यात आली आहे.
शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे करण्यासाठी वृक्षतोड केली जात आहे. वृक्षतोडीच्या बदल्यात वृक्षलागवड करण्यासाठी ८.५७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नव्याने लागवड करण्यात आलेल्या वृक्षांना संरक्षण देण्यासाठी एक कोटी रुपयांच्या वृक्षसंरक्षक जाळ्या खरेदी करण्यात येणार आहेत.
जुन्या वृक्षसंरक्षक जाळ्यांच्या दुरुस्तीसाठी १९ लाख रुपये तरतूद, तर खत व माती खरेदीसाठी २५ लाख रुपयांची तरतूद आहे. नर्सरीसाठी २४ लाख रुपये, नर्सरी सुधारण्यासाठी दोन लाख रुपये, तर रोपे खरेदी करण्यासाठी ५० लाख रुपयांची तरतूद आहे. शोभेच्या कुंड्या खरेदी करण्यासाठी २५ लाख रुपये, तर हरितगृह व कंपोस्ट बेड उभारण्यासाठी पाच लाख रुपयांची तरतूद व वृक्ष अभियानासाठी जनजागृती केली जाणार असून, त्यासाठी पाच लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. वृक्षांच्या पुनर्रोपणासाठी दीड कोटी रुपये व वृक्षपुनर्रोपण वाहन व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी २.७५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
Sanjay Raut Raj Thackeray meeting : संजय राऊत, राज ठाकरेंच्या भेटीला; महापालिका निवडणुकीनंतर ठाकरे बंधूंमध्ये दुरावा?यापूर्वी २०१६ मध्ये वृक्षगणना
महापालिकेला दर पाच वर्षांनी शहरातील वृक्षसंपदेची गणना करणे बंधनकारक आहे. यापूर्वी सन २०१६ मध्ये वृक्षगणना करण्यात आली होती. २५ लाख वृक्षांची गणना करण्याचा प्रस्ताव होता. २५ लाख वृक्षांची गणना झाल्यानंतर देखील अतिरिक्त २४ लाख वृक्षांची गणना करण्यात आली. त्या संदर्भात देयके सादर करण्यात आली; मात्र महासभेची परवानगी न घेताच अतिरिक्त वृक्षगणना करण्यात आल्याने अद्यापपर्यंत देयके अदा करण्यात आलेली नाहीत. यावर्षी नव्याने वृक्षगणना केली जाणार असून, त्यासाठी अंदाजपत्रकामध्ये ३.४० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.