नाशिक: त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकाला झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये सातत्याने उद्भवणारे वाद, आर्थिक लुटीबाबत भाविकांच्या तक्रारी तसेच मारहाणीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी चौकशीचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
चौकशीत त्र्यंबकेश्वर देवस्थानाची कार्यपद्धती, व्हीआयपी पासेससह अन्य मार्गांनी मिळणारे आर्थिक उत्पन्न, भाविकांच्या सोयी-सुविधांचा आढावा घेतला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये सोमवारी (ता. २) हरियानातून आलेल्या भाविकाला तेथील सुरक्षारक्षकांनी मारहाण केली. या घटनेवर सर्वच स्तरांतून रोष व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, या प्रकारानंतर मंदिर व्यवस्थापनाने सुरक्षारक्षकांना पाठीशी घातले आहे. दरम्यान, अलीकडच्या काळामध्ये त्र्यंबकेश्वरमध्ये अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे देवस्थान, शहर व पर्यायाने नाशिक जिल्ह्याची प्रतिमा मलिन होत आहे. येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने ही चिंतेची बाब आहे.
असेच प्रकार घडत राहिल्यास सिंहस्थ कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांना असुविधांना सामोरे जावे लागू शकते. त्यातूनच नाशिकबद्दल नकारात्मक संदेश देशविदेशात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा घटनांना आळा घालण्यासाठी विभागीय आयुक्त गेडाम यांनी पुढाकार घेतला आहे.
शिर्डीचे श्री साईबाबा मंदिर तसेच शनिशिंगणापूरच्या धर्तीवर त्र्यंबकेश्वर मंदिर व्यवस्थापनाच्या कार्याला शिस्त लावताना कारभारात पारदर्शकता आणण्याचा निर्णय आयुक्त डॉ. गेडाम यांनी घेतला आहे. त्याकरिता कठोर पावले उचलत मंदिर व्यवस्थापनाच्या कार्याचा पंचनामा करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामध्ये भाविकांची होणारी आर्थिक लूट, नियमित रांगेत दर्शनासाठी उभ्या राहणाऱ्या भाविकांची होणारी गैरसोय, देवस्थानाला विविध मार्गांनी मिळणारे आर्थिक उत्पन्न तसेच भाविकांसाठी देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांचा लेखाजोखा घेतला जाणार आहे. त्यामुळे सिंहस्थापूर्वी त्र्यंबकेश्वरमधील व्यवस्थेत बदल होत भाविकांना चांगल्या सुविधा उपलब्ध होतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार त्र्यंबकेश्वरमध्ये वितरित केले जाणारे पासेस, त्यामधून मिळणारा निधी, दर्शनाच्या ढिसाळ व्यवस्थेसोबत तेथील एकूणच आर्थिक बाबींची चौकशी करण्यात येईल. या चौकशीकरिता इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे प्रांताधिकारी चौकशी करून २१ दिवसात अहवाल सादर करतील. चौकशीत तेथील उपस्थितांचे जबाब नोंदविले जातील.
-आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी