Pune News : दोन हजार आशा सेविका मानधनाविना, पाच महिन्यापासून निधी नाही; महिलांपुढे आर्थिक संकट
esakal March 06, 2026 10:45 PM

पुणे : पुणे महापालिकेत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत काम करणाऱ्या सुमारे दोन हजार आशा सेविकांना गेल्या पाच महिन्यांपासून मानधन मिळालेले नसल्याने त्यांना संसार कसा चालवावा असा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेकडून रोज १२ तास काम करून घेतले जात आहे, शासनाच्या आरोग्याचे उपक्रम राबविले आहेत. पण मानधन मिळत नसल्याने आशा सेविका हवालदिल झाल्या आहेत. शासनाकडून निधी न आल्याने आम्ही मानधन देऊ शकणार नाही असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान राबविण्यासाठी आणि शहरातील आरोग्य व्यवस्थेमध्ये आशा सेविकांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. घराघरात जाऊन नागरिकांच्या आरोग्याची माहिती घेणे, गर्भवती महिलांची नोंदणी करणे, लसीकरणासाठी जनजागृती करणे, नवजात बालक आणि मातांची काळजी घेणे, तसेच विविध साथीच्या आजारांबाबत माहिती देणे अशी अनेक जबाबदारी त्या पार पाडतात. कोरोना, स्वाइन फ्लू यांसारख्या साथीच्या काळातही या सेविकांनी मोठ्या प्रमाणावर काम केले होते.

Maratha Reservation : मागण्या मान्य, उपोषण मागे; हैदराबाद, सातारा गॅझेटची अंमलबजावणी होणार; आंदोलकांचा जल्लोष

मात्र, एवढे महत्त्वाचे काम करूनही गेल्या पाच महिन्यांपासून मानधन मिळाले नसल्याने सेविकांमध्ये तीव्र नाराजी आहे. महापालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप ठोस तोडगा निघालेला नाही. राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानासाठी राज्य सरकारकडून महापालिनिधी मिळतो. परंतु निधी न मिळाल्यामुळे मानधन देणे शक्य झाले नाही. आम्ही पाठपुरावा करत आहोत. करत आहोत असे महापालिका प्रशासनानेच म्हणणे आहे. यामध्ये अल्प उत्पन्न गटातील या आशा सेविकांमध्ये आर्थिक संकट निर्माण झाले आहे.

९५०० मानधन

आशा सेविका सकाळी सात ते संध्याकाळी सात असे जवळपास १२ तास काम करतात. त्यांना रोज किमान ५० घरांना भेटी देणे आवश्यक असते. या कामासाठी त्यांना प्रति महिना सुमारे ९ हजार ५०० रुपये इतके मानधन मिळते. कामाच्या तुलनेत हे मानधन अपुरे असताना त्यात वाढ करावी अशी मागणी आशा सेविकांची आहे. ही मागणी मान्य करण्याचे तर सोडाच पण केलेल्या कामाचाही मोबदला मिळण्यास पाच महिने थांबावे लागत आहे.

‘‘आशा सेविकांचे मानधन महापालिका देत नाही तर राज्य शासनाकडून दिले जाते. पण महापालिकेला ही रक्कम अजून मिळालेली नाही. ही रक्कम लवकरात लवकर मिळावी यासाठी आमचा पाठपुरावा सुरु आहे. रक्कम मिळताच मानधन दिले जाईल.’’

- पवनीत कौर, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

‘‘मी रोज १२ तास काम करते, घरोघरी आम्हाला फिरून गर्भवती महिलांची नोंदणी, लसीकरण यासह अन्य कामे करावे लागतात. पण गेल्या पाच महिन्यापासून मानधन मिळालेले नाही. अनेकदा पाठपुरावा केला तरीही रक्कम जमा झालेली नाही. महापालिका निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी केलेल्या कामाचाही भत्ता अजूनपर्यंत मिळालेला नाही.’’

- एका आशा सेविका

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.