Reuters व्हाइट हाऊसमध्ये कॉलेज क्रीडासंदर्भात झालेल्या राउंडटेबलदरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी (6 मार्च) म्हटलं की, अमेरिका इराणविरोधात चांगलं काम करत आहे. इराणचं सैन्य 'पूर्णपणे उद्ध्वस्त' झाल्याचाही दावा त्यांनी केला.
व्हाईट हाऊसमध्ये कॉलेज स्पोर्टसवर आयोजित राउंडटेबल दरम्यान ट्रम्प यांनी पत्रकारांशी संवाद साधला. एका प्रश्नाला उत्तर देताना ट्रम्प म्हणाले, "आमचं सैन्य अतिशय चांगली कामगिरी करत आहेत"
ट्रम्प म्हणाले, "त्यांचं (इराण) सैन्य संपलं आहे, त्यांचं नौदलही संपुष्टात आलं असून हवाईदलही पूर्णपणे नष्ट झालं आहे. त्यांचं कम्युनिकेशन बंद पडलं असून पहिल्या आणि दुसऱ्या फळीतील नेतृत्व संपलं आहे. त्यांच्याकडे आता तिसऱ्या फळीतील नेतृत्व उरलं आहे."
"त्यांच्याकडे 32 जहाजं होती, ती सर्व जहाजं समुद्रात बुडाली आहेत", असाही दावा त्यांनी केला.
इराणच्या मेहराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्फोट, प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं?इराणच्या महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या विमानतळांपैकी एक असलेल्या मेहराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे.
प्रत्यक्षदर्शींनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हीडिओ फुटेजमध्ये मेहराबाद विमानतळावर जळणारी विमाने आणि त्यातून निघणारा धूर दिसत आहे.
शुक्रवारी (6 मार्च) घेतलेल्या उपग्रह छायाचित्रांमध्ये विमानतळावर अनेक विमान असल्याचं दिसून येत आहे.
इराणच्या सरकारी माध्यमांनीही विमानतळाच्या काही भागांना लक्ष्य करण्यात आल्याचं वृत्त दिलं आहे.
हे अशा वेळी घडलं, जेव्हा इस्रायली लष्कराने इराणमध्ये 'मोठ्या प्रमाणावर नवे हल्ले' सुरू करत असल्याचे सांगितलं.
यापूर्वी इस्रायली लष्कराने 4 मार्च रोजीही या विमानतळाला लक्ष्य केले होते. त्यावेळी त्यांच्या हल्ल्यांमुळे इस्रायली हवाई दलासाठी धोका निर्माण करणाऱ्या संरक्षण आणि शोध यंत्रणा नष्ट केल्याचा दावा करण्यात आला होता.
या विमानतळाच्या नेमक्या कोणत्या भागांना लक्ष्य करण्यात आलं हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, यावेळी बॉम्बस्फोट अतिशय तीव्र होता, असं प्रत्यक्षदर्शींनी म्हटलं आहे.
इराणमध्ये आतापर्यंत किती जणांचा मृत्यू?संयुक्त राष्ट्रांमधील (युएन) इराणचे स्थायी प्रतिनिधी अमीर सईद इरवानी यांनी सांगितलं की, 28 फेब्रुवारीपासून देशावर झालेल्या अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यांमुळे आतापर्यंत 1,332 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
न्यूयॉर्कमधील युएन मुख्यालयात पत्रकारांशी बोलताना इरवानी यांनी सांगितलं की, इराणी रेड क्रिसेंट सोसायटीच्या मते मृतांमध्ये महिला आणि मुलांचाही समावेश आहे.
ते म्हणाले, "हजारो लोक जखमी झाले आहेत आणि ही संख्या सतत वाढत आहे."
UN संयुक्त राष्ट्रांमधील इराणचे स्थायी प्रतिनिधी अमीर सईद इरवानी म्हणाले की, हल्ल्यात "हजारो लोक जखमी झाले असून ही संख्या सतत वाढत आहे."
शाळा, रुग्णालये आणि इतर सार्वजनिक पायाभूत सुविधांना 'जाणूनबुजून' लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप इरवानी यांनी केला.
मात्र, अमेरिकेने नागरी पायाभूत सुविधांवर हल्ले केल्याचा आरोप नाकारला आहे. इराणमधील मुलींच्या शाळेवर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात अमेरिकेने 'चौकशी केली जाईल' असे म्हटले. या हल्ल्यात 150 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये बहुतेक मुली आहेत.
दरम्यान, इस्रायलनेही इराणवर त्यांच्या नागरिकांना लक्ष्य केल्याचा आरोप केला आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)