सेवा रस्त्यांवरील कोंडीने प्रवास कंटाळवाणा
esakal March 07, 2026 04:45 PM

भोसरी, ता. ६ : राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखालील पुणे-नाशिक महामार्गासह दोन्ही बाजूंकडील सेवा रस्त्यांवर वाहनांची कोंडी नेहमीचीच झाली आहे. त्यामुळे वाहन चालकांना त्रासाला सामोरे जावे लागत असून, प्रवास कंटाळवाणा होत आहे.

भोसरीतील पुणे-नाशिक महामार्गाच्या सेवा रस्त्यावर आदिनाथनगर ते धावडे वस्तीपर्यंतचा रस्ता आणि नाशिक-पुणे महामार्गाच्या सेवा रस्त्यावर रोशल गार्डन ते चांदणी चौकादरम्यान ही वाहतूक कोंडी निर्माण होते. या रस्त्यावर चांदणी चौक, संविधान चौक, पीएमटी चौक, भोसरी-आळंदी रस्ता चौक, बीआरटी चौक, कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह चौक आदी चौक अगदी शंभर-दोनशे मीटर अंतरावर येतात. त्यामुळे एका चौकात झालेल्या वाहतूक कोंडीचा परिणाम हा इतर चौकांतही दिसून येतो.
भोसरीतील चांदणी चौकात लांडेवाडीकडून येणारी वाहने मोशी, आळंदी रस्ता व दिघी रस्त्याकडे वळतात. त्याचप्रमाणे लांडेवाडी चौकमार्गे निगडी चिंचवड आदी भागाकडे जाणारी वाहनेही या चौकातून जातात. त्यामुळे या चौकात वाहनांची गर्दी दिसते. या ठिकाणी वॉर्डन किंवा वाहतूक पोलीस असतात मात्र अरुंद रस्त्यामुळे वाहनांच्या कोंडीत भर पडते.
चक्रपाणी वसाहतीकडे जाणाऱ्या चौकात पीएमपी बसचा थांबा आहे. या थांब्यामुळेही येथे वाहनांची कोंडी होते. संविधान चौकात दिघी रस्त्याने येणारी वाहने मोशी, पुणे, लांडेवाडी आदि मार्गाने पुढे जातात. प्रत्येक चौकात वाहनचालक अस्ताव्यस्तपणे पुढे जाण्याचा प्रयत्न करतात.
पीएमपीच्या सद्गुरू डेपो चौकात वाहतूक नियंत्रक दिवे आहेत. मात्र, त्याचे पालन होताना दिसत नाही. येथे वाहनचालक अस्ताव्यस्तपणे वाहने चालवतात. इंद्रायणीनगरातील श्री तिरुपती बालाजी चौकाकडे जाणाऱ्या चौकातही अशीच परिस्थिती पहायला मिळते.

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी
- सेवा रस्ता हात गाडी आणि पथारीमुक्त करावा
- सेवा रस्त्यावरील दोन्ही बाजूकडील ‘नो-पार्किंग झोन’ची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी
- सायंकाळच्या वेळेस खासगी प्रवासी बसना रस्त्यावर थांबण्यास मज्जाव करावा
- चौकातील वाहतूक पोलिस आणि वॉर्डनची संख्या वाढवावी
- चौकातील वाहतूक नियंत्रक दिव्यांचे पालन न करणाऱ्या वाहन चालाकांवर कारवाई करणे

भोसरीतील पुणे-नाशिक महामार्गासह सेवा रस्त्यावर सायंकाळच्या वेळस वाहतूक कोंडी झालेली असते. त्यामुळे सायंकाळच्या वेळेस भोसरीतील रस्त्यांवरून प्रवास करताना वेळ वाया जातो. त्याचप्रमाणे मानसिक त्रासही होतो.
- चंद्रकांत काळखैरे, वाहनचालक.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.