मोशी, ता. ६ : आमराई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मोशी प्राधिकरणातील पेठ क्रमांक ४ मध्ये नागरिकांच्या सहभागातून श्री दत्त मंदिर उभारण्यात आले. या मंदिराचा लोकार्पण सोहळा, श्रींची मिरवणूक व श्री गुरुदेवदत्त मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा गुरुवारी (ता. ५) रोजी उत्साहात झाला.
बुधवारी (ता. ४) वारकरी, टाळ, मृदंग, ढोल ताशा, ब्रास बँड आदी पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि चांदीच्या अश्वरथामध्ये श्रींची संतनगर चौक ते आमराईतील मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. महिला भाविकांनी डोक्यावर पवित्र कलश घेत, फेर धरत, फुगड्या खेळत ठेका धरला. यानिमित्त मंदिराला विविध फुले आणि विद्युत रोषणाई करण्यात आली होती. पुरोहितांच्या मंत्रघोषात मंदिराची वास्तू शांती, शुद्धीकरण करण्यात आले. श्री गुरुदेवदत्त मूर्तीस महाअभिषेक, मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आणि मंदिरावर कलशारोहण करण्यात आले. दिवसभर संगीत भजन तर सायंकाळी पुरुषोत्तम महाराज पाटील यांचे हरिकीर्तन झाले. रात्री महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमासाठी ट्रस्टचे पदाधिकारी, विश्वस्त कार्यकर्ते यांचे परिश्रम लाभले.