डॉ. विश्वास सुतार - saptrang@esakal.com
‘आधुनिक भारताचे शिल्पकार : तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी’ हा वैचारिक ग्रंथ शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरतर्फे नुकताच प्रकाशित करण्यात आला. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे आणि शिवाजी विद्यापीठाच्या गांधी अभ्यासकेंद्राचे समन्वयक प्रा. डॉ. प्रकाश पवार यांनी प्रस्तुत ग्रंथाचे संपादन केले आहे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षाच्या निमित्ताने शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे महात्मा गांधी अध्यासन केंद्र आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी प्रतिष्ठान, वाई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी : कार्य आणि विचार’ या विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले. या चर्चासत्रातील मुलाखती व भाषणांचे ग्रंथरूप म्हणजे प्रस्तुत ग्रंथ होय.
डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी तर्कतीर्थांच्या समग्र साहित्याचे संपादन १८ खंडांत केलेले आहे. २०२५ मध्ये या समग्र खंडांचे प्रकाशन ‘महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई’मार्फत करण्यात आले. आता शिवाजी विद्यापीठाने अल्पावधीत अभिनव चर्चासत्र आयोजित करून विद्यापीठाचे वेगळेपण अधोरेखित केले. २७० पृष्ठांमध्ये व्यापलेल्या या ग्रंथात पानोपानी तर्कतीर्थांचे पुरोगामी विचार मांडलेले आढळतात. तर्कतीर्थ म्हटलं की, ज्ञानी, पंडित, विद्वान असंच व्यक्तिमत्त्व डोळ्यांसमोर येते, तेही विद्वान लोकांच्याच. मात्र, हा ग्रंथ सामान्य वाचकांनी वाचायलाच हवा. त्यामुळे तर्कतीर्थांच्या अनेक दुर्लक्षित पैलूंविषयी वाचकांना सजग माहिती मिळेल.
Premium|Ancient Indian Botany and Tree Names : वृक्षांच्या ऐतिहासिक संदर्भांचा शोध घेणारे अरुंधती वर्तक यांचे पुस्तकतर्कतीर्थांचे कौटुंबिक वारसदार डॉ. अशोक जोशी आणि डॉ. अशोक खंडकर हे अमेरिकेत वास्तव्यास आहेत. तर्कतीर्थांविषयी त्यांनी व्यक्त केलेल्या भावना अत्यंत हृद्य आहेत. शिवाजी विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनीही तर्कतीर्थांचे कालोचित स्मरण करत त्यांच्या विचारांना उद्धृत केले आहे.
प्रस्तुत ग्रंथात महाराष्ट्रातील वीस विद्वत्जनांनी आपापले आकलन वैचारिक स्वरूपात मांडले आहे. बीजभाषक ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकीहाळ यांनी राष्ट्रवाद, धर्म आणि समाजसुधारणा या अनुषंगाने तर्कतीर्थांच्या विचार, कार्याची मांडणी केली आहे. डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी तर्कतीर्थांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू संशोधनातून सिद्ध केले आहेत. मराठी विश्वकोशातील तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या नोंदींची मीमांसा दिलीप करंबेळकर आणि डॉ. राजा दीक्षित यांनी केलेली आहे. विश्वकोशाच्या साक्षेपी संपादकत्वाचे चिंतन डॉ. श्रीराम पवार यांनी अभ्यासपूर्ण मांडलेले आहेत. डॉ. रणधीर शिंदे, सरफराज अहमद, प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी तर्कतीर्थांचा सांस्कृतिक आणि साहित्यिक दृष्टिकोन मांडला आहे. विनोद शिरसाठ, डॉ. अशोक चौसाळकर, डॉ. अशोक राणा यांनी तर्कतीर्थांची विचारधारा आणि धर्मविचार स्पष्ट केले आहेत.
महात्मा गांधी आणि तर्कतीर्थ यांचा अनुबंध प्राचार्य डॉ. विश्वास पाटील यांनी सोदाहरण स्पष्ट केला आहे. डॉ. श्रीनिवास हेमाडे यांनी तर्कतीर्थांचे पाश्चात्य तत्त्वज्ञान; तर डॉ. सरोजा भाटे यांनी पौर्वात्य तत्त्वचिंतन याविषयी मांडणी केलेली आहे. शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी तर्कतीर्थांचा विज्ञानवाद स्पष्ट केला आहे. तर्कतीर्थांच्या व्याख्यानाविषयी प्रा. मिलिंद जोशी यांनी भाष्य केले आहे. डॉ. तारा भवाळकर यांनी तर्कतीर्थांची लोकसंस्कृतीविषयक शास्त्रीय दृष्टी प्रवाही भाषेत मांडली आहे. आधुनिक काळात तर्कतीर्थ नव्या व योग्य गोष्टींना कसे स्वीकारत होते, याबाबतचे चिंतन संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी केले आहे, तर ‘तर्कतीर्थांचे विचार कालातीत आहेत, ते मानवतावादी आणि लोककल्याणकारक आहेत. त्यांनी मांडलेले तर्कविचार हे कालातीत आहेत,’ अशी मांडणी डॉ. जब्बार पटेल यांनी केलेली आहे. ग्रंथाचा समारोप डॉ. पी. एस. पाटील यांच्या अध्यक्षीय मनोगताने झाला आहे.
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे खऱ्या अर्थाने परिवर्तनवादी होते, असेच या ग्रंथातून सिद्ध होते. ‘शास्त्र, शस्त्र नि अंतिमतः निःशस्त्र’ असा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास माणूसपणाच्या शोधाची फलश्रुतीच होय. हा संपादित ग्रंथ मराठी साहित्यविश्व आणि वैचारिक प्रबोधनाच्या चळवळीत मोलाची भर घालणारा आहे.
पुस्तकाचे नाव : आधुनिक भारताचे शिल्पकार : तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी
संपादक : डॉ. सुनीलकुमार लवटे,
डॉ. प्रकाश पवार
प्रकाशक : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
पृष्ठे : २०० मूल्य : १८० रु.