आजच्या काळात महिला शिक्षण, व्यवसाय, राजकारण, लष्कर, वैद्यकीय क्षेत्र, न्यायव्यवस्था अशा विविध क्षेत्रांत मोठी कामगिरी करत असतानाच. आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत असताना सरकारकडूनही महिलांसाठी अनेक उपयुक्त योजना राबवल्या जात आहेत. या योजनांमुळे आर्थिक सुरक्षितता, बचत, शिक्षण आणि स्वावलंबनाला चालना मिळते. चला, महिलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणाऱ्या पाच महत्त्वाच्या सरकारी योजनांविषयी सविस्तर जाणून घेऊया.
1. सुकन्या समृद्धी योजनासुकन्या समृद्धी योजना ही केंद्र सरकारची मुलींसाठीची बचत योजना आहे. 2015 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानांतर्गत ही योजना सुरू केली. या योजनेत मुलीच्या नावाने खाते उघडता येते. वर्षाला किमान 250 रुपये भरूनही खाते सुरू करता येते. या योजनेत सध्या सुमारे 8 टक्क्यांहून अधिक व्याजदर मिळतो.
तसेच आयकर कायद्याच्या कलम 80सी अंतर्गत कर सवलतही मिळते. 14 वर्षे रक्कम जमा करावी लागते आणि मुलगी 21 वर्षांची झाल्यावर पूर्ण रक्कम काढता येते. मुलीच्या शिक्षणासाठी आणि भविष्यासाठी ही योजना अत्यंत उपयुक्त आहे.
2. लाडकी बहिण योजनालाडकी बहिण योजना ही महाराष्ट्र शासनाची महत्त्वाची योजना आहे. 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळतो. पात्र लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत दिली जाते. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. महिलांना आर्थिक आधार देऊन त्यांना स्वावलंबी बनवणे हा या योजनेचा उद्देश आहे.
3. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनामहिलांसाठी सुरू करण्यात आलेली ही अल्पकालीन बचत योजना आहे. या योजनेत जास्तीत जास्त 2 लाख रुपये गुंतवता येतात. सुमारे 7.5 टक्के व्याजदर मिळतो. ही योजना 2023 मध्ये सुरू झाली असून दोन वर्षांच्या कालावधीत चांगला परतावा मिळवण्यासाठी हा सुरक्षित पर्याय मानला जातो.
4. बचत गट प्रोत्साहन योजनामहिलांच्या स्वयंसहाय्यता गटांना आर्थिक मदत व कर्जसुविधा देण्यासाठी ही योजना राबवली जाते. ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना लघुउद्योग सुरू करण्यासाठी भांडवल उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळे अनेक महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करून उत्पन्नाचे साधन निर्माण करत आहेत.
5. महिला कर्ज योजनाविविध बँका आणि सरकारी संस्थांमार्फत महिलांसाठी विशेष कर्ज योजना उपलब्ध आहेत. कमी व्याजदरात कर्ज देऊन व्यवसाय, शिक्षण किंवा घरगुती उद्योग सुरू करण्यासाठी मदत केली जाते. यामुळे महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळते.