धारावीखालून वांद्रे टर्मिनसपर्यंत भुयारी मार्ग, मुंबई मेट्रो 11 वर पाच नवी स्थानकं होणार; कसा असणार मार्ग? जाणून घ्या सविस्तर
जयदीप मेढे March 08, 2026 02:43 PM

Mumbai Metro: मुंबईतील मेट्रो (Mumbai Metro) जाळे अधिक व्यापक करण्यासाठी राज्य सरकारने (Maharashtra Government) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राच्या 2026-27 च्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मेट्रो मार्गिका 11 मध्ये काही महत्त्वाचे बदल जाहीर केले. 2025 मध्ये निश्चित करण्यात आलेल्या वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया या प्रस्तावित मार्गिकेचा आता विस्तार करण्यात येणार असून त्यामध्ये पाच नव्या स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. या बदलामुळे मुंबईतील पूर्व-पश्चिम तसेच उत्तर-दक्षिण भागांना अधिक प्रभावी जोडणी मिळणार आहे.

Mumbai Metro : कसा होणार मार्गिकेचा विस्तार?

मेट्रो मार्गिका 11 ही पूर्णपणे भुयारी असणार आहे. ही मार्गिका वडाळा येथून सुरू होऊन दक्षिण मुंबईपर्यंत जाणार असून ती मेट्रो लाइन 4 (वडाळा ते कासारवडवली) ला जोडली जाणार आहे. वडाळा स्थानकापासून या मार्गिकेचा विस्तार करण्यात येणार असून त्यामुळे ठाणे आणि पूर्व मुंबईतील प्रवाशांना दक्षिण मुंबईत पोहोचणे अधिक सोपे होणार आहे.

या प्रकल्पासाठी अंदाजे 23 हजार 487 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री फडणवीस यांनी धारावी आणि वांद्रे स्थानकांमार्गे वांद्रे टर्मिनसपर्यंत या मार्गिकेचा विस्तार करण्याची घोषणा केली. या विस्तारामुळे शहरातील प्रवास अधिक जलद आणि सुलभ होणार असल्याचे सांगितले जात आहे.

Mumbai Metro : मुंबई मेट्रो 11 वर पाच नवी स्थानकं होणार

सुरुवातीला मेट्रो 11 मार्गिका 17.5 किलोमीटर लांबीची प्रस्तावित होती. मात्र आता या मार्गिकेत 6.9 किलोमीटरची भर पडणार आहे. त्यामुळे एकूण मार्गिका सुमारे 24.4 किलोमीटरपर्यंत वाढणार आहे. तसेच या मार्गिकेवरील स्थानकांची संख्याही वाढवण्यात आली आहे. सुरुवातीला 14 स्थानकांचा प्रस्ताव होता, मात्र आता त्यामध्ये पाच नवीन स्थानकांचा समावेश करण्यात आला असून एकूण स्थानके 19 होणार आहेत.

नवीन प्रस्तावानुसार चुनाभट्टी, शीव, मध्य धारावी, वांद्रे पश्चिम आणि वांद्रे टर्मिनस ही पाच नवी स्थानके उभारण्यात येणार आहेत. यापूर्वी या मार्गिकेवर अनिक बस डेपो, सीजीएस बस कॉलनी, गणेश नगर, बीपीटी रुग्णालय, शिवडी, हे बंदर, बंदर कोल, रे रोड, भायखळा, नागपाडा जंक्शन, भेंडी बाजार, क्रॉफर्ड मार्केट, सीएसएमटी, हॉर्निमन सर्कल आणि एसपीएम सर्कल ही 14 स्थानके प्रस्तावित होती.

Mumbai Metro : मेट्रो 3, 4 आणि 2 बी शी जोडणी

नव्या प्रस्तावानुसार शिवडीच्या पुढे धारावी पुनर्विकास प्रकल्पाखालून ही भुयारी मार्गिका नेण्यात येणार आहे. त्यानंतर मिठी नदीच्या परिसरातून वांद्रे टर्मिनसपर्यंत मार्ग वाढवला जाणार आहे. धारावी स्थानकावरून ही मार्गिका मेट्रो 3 शी जोडली जाणार आहे. त्यामुळे कुलाबा, वांद्रे-कुर्ला संकुल (BKC) आणि सीप्झ परिसरात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. तसेच वांद्रे पश्चिम स्थानकावरून मेट्रो लाइन 2 बी शी जोडणी दिली जाणार आहे. त्यामुळे पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण मुंबईला एकाच मेट्रो जाळ्यातून जोडण्यास मदत होणार आहे. दरम्यान, मेट्रो 4 मार्गिकेमुळे कासारवडवलीपर्यंत थेट जोडणी मिळणार असल्याने ठाणे परिसरातील प्रवाशांनाही या प्रकल्पाचा मोठा लाभ होणार आहे.

आणखी वाचा

Beed Crime Santosh Deshmukh Case: मोठी बातमी: सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील एक आरोपी 14 महिन्यांनंतर जेलबाहेर येणार, कोर्टाकडून विशेष परवानगी; नेमकं कारण काय?

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.