Ashutosh Brahmachari : प्रयागराज येथे पोहोचण्यापूर्वी रीवा एक्सप्रेसमध्ये आशुतोष ब्रह्मचारी यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यामागे कट असल्याची शक्यता व्यक्त करत त्यांनी स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्यावर संशय व्यक्त केला आहे. दुसरीकडे शंकराचार्यांनी हे सर्व आरोप फेटाळत या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आशुतोष ब्रह्मचारी यांनी यापूर्वी प्रयागराज येथे स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्याविरोधात अल्पवयीनांवरील लैंगिक शोषणाच्या प्रकरणात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आता त्यांच्या वरच हल्ला झाल्यामुळे या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे.
आशुतोष ब्रह्मचारी यांनी सांगितले की ते गाझियाबाद येथून प्रयागराजकडे रीवा एक्सप्रेसने प्रवास करत होते. ते ट्रेनच्या एच-1 कोचमध्ये होते. फतेहपूर आणि सिराथू रेल्वे स्टेशन यांच्या दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
जीव वाचवण्यासाठी टॉयलेटचा घेतला आसरा
आशुतोष ब्रह्मचारी यांच्या मते, हल्लेखोर अचानक त्यांच्या जवळ आला आणि वार करू लागला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे ते घाबरले आणि त्यांनी कसाबसा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ट्रेनच्या टॉयलेटमध्ये स्वतःला बंद करून घेतले. हल्लेखोराच्या हातात धारदार शस्त्र होते आणि त्याने त्यांना गंभीर जखमी करण्याचा प्रयत्न केला असे त्यांनी सांगितले.
या हल्ल्यात त्यांच्या शरीरावर अनेक जखमा झाल्या आहेत. ट्रेन प्रयागराज जंक्शन येथे पोहोचल्यानंतर त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
शंकराचार्यांनी आरोप फेटाळले
दरम्यान, स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी आशुतोष ब्रह्मचारी यांनी केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. त्यांनी सांगितले की या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी. चौकशीनंतर सत्य स्पष्ट होईल आणि दूध का दूध पानी का पानी होईल असेही त्यांनी म्हटले.
यासोबतच त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, जर आशुतोष ब्रह्मचारी ट्रेनच्या टॉयलेटमध्ये जाताना व्यवस्थित होते आणि बाहेर येताना हल्ला झाल्याचा दावा करत असतील तर हा प्रकार संशयास्पद वाटतो. त्यांनी असा आरोपही केला की ही संपूर्ण कथा बनावटी असू शकते आणि सहानुभूती मिळवण्यासाठी किंवा सुरक्षा मिळवण्यासाठी हा प्रयत्न असू शकतो. या घटनेनंतर जीआरपी ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.