किवळे, ता. ८ : मामूर्डी-राऊतनगर, ऑस्टिन ते गोदरेज प्रकल्प परिसरात रस्त्याचे काम सुरू असताना ड्रेनेज लाईन फुटल्याने सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
सध्या या भागात रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान सांडपाणी वाहिनी फुटल्याने सांडपाणी रस्त्यावर येत असून परिसरात अस्वच्छता निर्माण झाली आहे. डास आणि आजार वाढण्याची शक्यता देखील निर्माण झाली आहे. स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही महापालिका अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
या संदर्भात नागरिकांनी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली असून सांडपाणी वाहिनी दुरुस्ती करून परिसर स्वच्छ करण्याची गरज असल्याचे सांगितले आहे.
वारंवार केबल तुटल्याने वीज पुरवठा खंडित
रस्त्याच्या कामादरम्यान खोदाई करताना वारंवार केबल्स तुटत असल्याने परिसरातील वीजपुरवठा खंडित होत आहे.
राऊतनगर परिसरात सुरू असलेल्या कामामुळे अनेक वेळा केबल्सचे नुकसान झाले आहे. खोदकाम करताना योग्य काळजी घेतली जात नसल्याने केबल्स तुटत आहेत. परिणामी नागरिकांना अनेक तास वीज नसल्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
नागरिकांनी प्रशासनाने काम करताना संबंधित विभागांशी समन्वय साधून केबल्सचे संरक्षण करावे व वारंवार होणारा वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी केली आहे.
साईनगर : रस्त्याच्या कामामुळे साईनगरला सांडपाणी वाहिनी फुटली असून सांडपाणी पाणी रस्त्यावर वाहत आहे.