Iran vs Israel War Pakistan Fuel Crisis: इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा (Iran vs Israel War) परिणाम आता शेजारील पाकिस्तानवरही (Pakistan) दिसू लागला आहे. होर्मुज सामुद्रधुनीत निर्माण झालेल्या तणावामुळे तेल पुरवठा विस्कळीत झाला असून पाकिस्तानमध्ये इंधनाची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. वाढती महागाई आणि इंधन संकट लक्षात घेता पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ (shahbaz sharif) यांनी देशभरात अनेक कठोर निर्णय जाहीर केले आहेत.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पंतप्रधानांनी रविवारी उच्चस्तरीय प्रशासकीय बैठक बोलावली. या बैठकीत इंधन बचत, सरकारी खर्चात कपात आणि प्रशासनिक कामकाजात बदल करण्यासंदर्भात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यानुसार पुढील दोन महिन्यांसाठी सरकारी विभागांना देण्यात येणाऱ्या इंधन पुरवठ्यात तब्बल 50 टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, रुग्णवाहिका आणि सार्वजनिक बस सेवांना या कपातीमधून वगळण्यात आले आहे.
याशिवाय, सरकारी अधिकाऱ्यांना इफ्तार पार्टीसारख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच, सरकारमधील मंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना अत्यावश्यक कामाशिवाय परदेश दौरे करण्यास मनाई करण्यात आली आहे. इंधन बचत आणि खर्च कमी करण्यासाठी ऑनलाइन बैठकींना प्राधान्य देण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
इंधन संकटाचा परिणाम शिक्षण क्षेत्रावरही झाला आहे. देशातील सर्व सरकारी शाळांना दोन आठवड्यांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर उच्च शिक्षणाच्या वर्गांना ऑनलाइन पद्धतीने चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सरकारी आणि काही खाजगी कार्यालयांना ‘वर्क फ्रॉम होम’ पद्धतीने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता सरकारी विभागांतील 50 टक्के कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, वाढत्या आर्थिक संकटामुळे सरकारी अधिकाऱ्यांच्या पगारातही कपात करण्यात आली आहे. काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दोन दिवसांचा पगार कापण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बँका वगळता अनेक सरकारी कार्यालये आता आठवड्यातून केवळ चार दिवस सुरू राहतील, असा निर्णयही सरकारने घेतला आहे. पाकिस्तानला मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल इराणकडून मिळत होते. मात्र इराणवर झालेल्या हल्ल्यांनंतर तेल पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये पेट्रोल आणि डिझेलची टंचाई निर्माण झाली असून अनेक पेट्रोल पंपांवर इंधन संपल्याच्या घटना समोर येत आहेत. आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानसाठी ही परिस्थिती अत्यंत गंभीर मानली जात आहे.
होर्मुज सामुद्रधुनीतून होणारा तेल पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे येत्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत आणखी मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तान सरकार युद्धपातळीवर उपाययोजना करत असून इंधन बचत आणि आर्थिक शिस्त लागू करण्यावर भर देत आहे. तसेच या युद्धाचा परिणाम केवळ इंधनावरच नव्हे तर जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावरही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आणखी वाचा