गुजरातमध्ये सुरू झालेला 'हिंदू स्टडिज' कोर्स चार वर्षांत बंद होण्याच्या मार्गावर? विद्यार्थी काय म्हणाले?
BBC Marathi March 11, 2026 02:45 PM
Gettty Images प्रतीकात्मक छायाचित्र

वडोदऱ्यातील प्रतिष्ठित महाराजा सयाजीराव (एम. एस.) विद्यापीठात चार वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेला हिंदू स्टडीज अभ्यासक्रम सध्या वादात सापडला आहे. त्यामुळं हा अभ्यासक्रम बंद होण्याच्या मार्गावर असल्याच्या चर्चाही होत आहे.

या अभ्यासक्रमाच्या व्यवस्थापनावरून प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून प्राध्यापकांना गेल्या सहा महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याचे आरोपही केले जात आहेत.

याबाबत (एम. एस.) विद्यापीठाच्या कला विभागाच्या डीन कल्पना गवळी यांच्याशी बीबीसी गुजरातीने संवाद साधला. त्या म्हणाल्या की, प्राध्यापकांच्या वेतनासारखे प्रश्न अलीकडेच सोडवले गेले आहेत.

दरम्यान, भारतात धार्मिक शिक्षणासाठीचे प्रयत्न नवीन नाहीत. मात्र मोठ्या प्रमाणावर प्रचार करूनही धार्मिक शिक्षणासाठी सुरू करण्यात आलेल्या या अभ्यासक्रमाची सद्यस्थिती केविलवाणी आहे.

यामागे विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याच्या कारणावरुनही एमएस विद्यापीठाच्या कला विभागाला टीकेला सामोरं जावं लागत आहे.

नव्या शिक्षण धोरणाअंतर्गत वर्ष 2022-23 मध्ये एमएस विद्यापीठात हिंदू धर्माच्या अभ्यासासाठी 'हिंदू स्टडीज' हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला होता.

परंतु या अभ्यासक्रमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कालांतराने कमी होत गेल्याने यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.

हा अभ्यासक्रम वादात का सापडला?

या अभ्यासक्रमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी अलीकडेच आंदोलन केलं होतं. त्यांचं म्हणणं आहे की हा कोर्स अचानक बंद झाला तर त्यांचं शिक्षण अर्धवट राहील. विद्यार्थ्यांच्या मते विद्यापीठ प्रशासनाकडून योग्य नियोजन आणि लक्ष न दिल्यामुळे अवघ्या चार वर्षांत हा अभ्यासक्रम बंद होण्याच्या मार्गावर आहे.

Hardik महाराजा सयाजीराव विद्यापीठ

सध्या या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकीच आहे. एमएस विद्यापीठात हिंदू स्टडीजच्या दुसऱ्या वर्षात शिकणारी मुस्कान गिरी सांगते, "पहिल्या वर्षात आठ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. मी सायकोलॉजी सोडून या अभ्यासक्रमात प्रवेश घेतला, मात्र या निर्णयाचा मला आता पश्चाताप होतोय."

हा अभ्यासक्रम बंद होईल या भीतीने विद्यार्थी संभ्रमात असून आपल्या भविष्याबाबत चिंतित आहेत.

विद्यार्थ्यांच्या मते हिंदू अभ्यासाच्या नावाखाली हा कोर्स सुरू तर करण्यात आला. मात्र, तो व्यवस्थितरित्या चालवण्यासाठी आवश्यक अशी व्यवस्था करण्यात आलेली नाही.

हिंदू अध्ययन केंद्रात शिकणारी महक सांगते, "जेव्हा आम्ही या अभ्यासक्रमात प्रवेश घेतला त्यावेळी 25 विद्यार्थी होते. हा अभ्यासक्रम सुरू झाल्यानंतरची ही दुसरा बॅच होती. परंतु, कालांतराने विद्यार्थ्यांची संख्या कमी होत गेली. या स्थितीला येथील व्यवस्थापन जबाबरदार आहे."

Hardik

हिंदू स्टडिजमध्ये शिकणाऱ्या 72 वर्षांच्या कला जोशीपुरा म्हणतात, "या अभ्यासक्रमासाठीची प्रवेश प्रक्रिया सोपी नाही. वेबसाइट वारंवार हँग होते."

अशा प्रकारचा अभ्यासक्रम सुरू केल्यानंतर त्याकडे लक्ष देणेही तितकेच महत्त्वाचे असल्याची भावना मुस्कान गिरी यांनी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, "मी पहिल्या वर्षात असताना, मला वाटलं होतं की या कोर्समधून मला खूप काही शिकायला मिळेल."

एमएस विद्यापीठातील आणखी एक विद्यार्थी वीरेंद्रसिंह चौहान म्हणतात, "जर हिंदू संस्कृतीचा हा अभ्यासक्रम बंद होणार असेल तर ती व्यवस्थापनासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे."

विरेंद्रसिंह पुढे म्हणतात, "फ्रेंच, जर्मन आणि रशियन भाषेचे अभ्यासक्रम व्यवस्थित चालू शकतात, तर मग फक्त हिंदू अभ्यासक्रम चालवण्यातच अडचण का येत आहे?"

त्यांचं म्हणणं आहे की, हा अभ्यासक्रम हायर पेमेंट प्रोग्राम (HPP) अंतर्गत न ठेवता नियमित अभ्यासक्रमात समाविष्ट करायला हवा आणि त्याचे शुल्कदेखील कमी करायला हवे.

हिंदू अभ्यासक्रमात नेमकं आहे तरी काय?

केंद्र सरकारच्या नव्या शिक्षण धोरणाअंतर्गत वडोदऱ्यातील एमएस विद्यापीठाच्या कला शाखेत हिंदू अभ्यासातंर्गत बीए ऑनर्स अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे.

विद्यापीठाच्या वेबसाइटवरील माहितीनुसार हा एक 'हायर पेमेंट प्रोग्राम' आहे. बारावीपर्यंत शिक्षण घेतलेले कोणत्याही शाखेचे विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात. तर, प्रवेश हा पूर्णपणे गुणवत्तेच्या आधारावर दिला जातो.

वेबसाइटनुसार या अभ्यासक्रमासाठीचा अर्ज व प्रवेश परीक्षेचे शुल्क 300 रुपये आहे. तर पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षासाठीचं वार्षिक शुल्क 14,000 रुपये इतकं आहे.

हा तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम असून तो सहा सत्रांमध्ये विभागलेला आहे. ज्यामध्ये हिंदू तत्त्वज्ञान, हिंदू दर्शन, योगशास्त्र, प्रमाण सिद्धांत, उपनिषद आणि वेदांचा परिचय यांसारखे विषय समाविष्ट आहेत.

Hardik

एमएस विद्यापीठाच्या वेबसाइटनुसार, या अभ्यासक्रमात रामायण, महाभारत, पुराण, भगवद्गीता, भक्ती चळवळ तसेच शैव, वैष्णव आणि शक्ती परंपरा यांसारखे विषय आहेत. याशिवाय हिंदू मानसशास्त्र, आयुर्वेद, अर्थशास्त्र (राजकारण), नाट्यशास्त्र, काव्यशास्त्र, वास्तुशास्त्र आणि वास्तुकला यांसारख्या विषयांचाही अभ्यासक्रमात समावेश आहेत.

हा अभ्यासक्रम विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) शिफारस केलेल्या अभ्यासक्रमावर आधारित असून त्यात इंटर्नशिप प्रोग्रामसारख्या कार्यक्रमांचाही समावेश आहे.

मूलभूत सुविधांचाही अभाव

विद्यापीठाने या कोर्सच्या विद्यार्थ्यांसाठी चांगल्या वर्गखोल्याही उपलब्ध करून दिल्या नसल्याचा विद्यार्थ्यांचा दावा आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी विद्यापीठात ठिकठिकाणी भटकावं लागतं, असल्याचं ते म्हणाले.

मुस्कान म्हणाल्या की, "व्यवस्थापनानं हा कोर्स वाचवण्यासाठी काहीही केलं नाही. आम्हाला लेक्चरसाठी वडोदरा संस्कृत महाविद्यालयात जावं लागतं. स्थिती एवढी वाईट आहे की, अनेकदा विद्यार्थ्यांना मोकळ्या जागेत, पार्कमध्ये झाडाखाली गवतावर बसून अभ्यास करावा लागतो. एवढंच काय, पण इथं प्राध्यापकांसाठीही स्वतंत्र स्टाफरूम नाही."

कला जोशीपुरा यांनीही हिंदू स्टडीजसाठी स्टाफ रूम नसल्याचं म्हटलं.

कधी कधी वर्गखोल्यांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांना रिकाम्या वर्गांमध्ये बसावं लागतं. काही वेळा तर त्यांना गवतावर बसूनही अभ्यास करावा लागतो, असं त्यांनी सांगितलं.

Hardik

या प्रकरणात बीबीसी गुजरातीनं एमएस विद्यापीठाच्या आर्ट्स फॅकल्टीच्या डीन कल्पना गवळी यांच्याशी संपर्क साधला.

त्यांनी सांगितलं की, "एमएस विद्यापीठात 2022-23 मध्ये सुरू करण्यात आलेल्या हिंदू अध्ययन केंद्रात कालांतरानं प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली असून संख्या टिकवून ठेवणंही कठीण होत आहे."

विद्यार्थ्यांच्या संख्येबाबत गवळी यांनी बीबीसी गुजरातीला सांगितलं की, "हायर पेमेंट प्रोग्राम असल्यामुळं यात विद्यार्थ्यांच्या संख्येबाबत काही अडचणी येत आहेत. 2022 मध्ये हा कार्यक्रम सुरू झाला तेव्हा विद्यार्थ्यांची संख्या 30 होती, ती आता 10 वर आली आहे."

अशा प्रकारे हळू हळू प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होत गेली आहे.

गवळी म्हणतात की, "कोर्समध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा यासाठी मी या वर्षी पुन्हा प्रयत्न करेन. हे केंद्र जास्त शुल्क असलेलं केंद्र आहे. ते तीन वर्षे चालवलं जाणार आहे.

त्यात विद्यार्थ्यांची संख्या कमी होण्यासारख्या समस्या आहेत. विद्यार्थ्यांची संख्या वाढावी म्हणून आम्ही कोर्सचा जास्त प्रचार करू. शिक्षकांना वेळेवर वेतन मिळण्याची व्यवस्था लवकरच केली जाईल."

नोकरीच्या काही संधी आहेत का?

डीन कल्पना गवळी यांनी बीबीसी गुजरातीशी बोलताना म्हटलं की, "हा कोर्स विद्यार्थ्यांना टेंपर मॅनेजमेंटसारख्या ठिकाणी नोकरी मिळवण्यासाठी मदत करू शकतो. तसंच विद्यार्थी संस्कृत कॉलेज तसेच गुरुकुलांमध्येही नोकरी मिळवू शकतात."

"इंटर्नशिपसाठी आम्ही विद्यार्थ्यांना बडोद्याच्या गुरुकुलमध्येही पाठवलं आहे," असंही त्या म्हणाल्या.

याबरोबरच विद्यार्थ्यांनी प्राध्यापकांना समान वेतन मिळत नसल्याच्या मुद्द्यावरही आंदोलन केलं.

विद्यार्थिनी मेहक हिनं याबाबत तक्रार करत म्हटलं की, "गेल्या वर्षी या कोर्समध्ये दोन प्राध्यापक सात विषय शिकवत होते. या वर्षी चार प्राध्यापक आहेत. पण त्यांना सहा महिन्यांपासून वेतन मिळालेलं नाही. त्यांना वेतन मिळालं नाही तर हा कोर्स किती दिवस चालणार? हे खरंच लाजिरवाणं आहे."

hardik एमएस विद्यापीठातील कला विद्याशाखेच्या डीन कल्पना गवळी

विद्यार्थिनी कला जोशीपुरा म्हणाल्या की, "वेतन न मिळाल्यामुळं शिक्षक अडचणीत आहेत. हा कोर्स बंद होण्याच्या उंबरठ्यावर आहे, त्यामुळं यामागील कारणांची चौकशी व्हायला हवी."

बीबीसीनं या प्रकरणात डीन कल्पना गवळी यांना विचारलं असता त्यांनी म्हटलं की, "शिक्षकांच्या वेतनाची समस्या सध्या आम्ही सोडवली आहे."

बीबीसीनं हा कोर्स शिकवणाऱ्या प्राध्यापकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली नाही. त्यांनी प्रतिक्रिया दिल्यास ती या रिपोर्टमध्ये समाविष्ट केली जाईल.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

  • 12 वी पेपर फुटीचे आणखी एक प्रकरण; खासगी क्लासच्या टेस्ट सीरिजचा आणि बोर्डाचा केमिस्ट्री पेपर 'सेम टू सेम' कसा निघाला?
  • मुंबईतील झोपडपट्टीत शाळा सुरू करणाऱ्या शिक्षिकेला 9 कोटी रुपयांचा पुरस्कार
  • गडचिरोलीच्या शारदाला 11 लाखांची शिष्यवृत्ती; शेतमजूर कुटुंबातील मुलीची संघर्षमय प्रेरणादायी कहाणी
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.