नवी दिल्ली : विरोधी पक्षांकडून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर काल आणि आज लोकसभेत चर्चा सुरु आहे. ही चर्चा सुरु असतानाच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसनं मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्तावासाठी पुढाकार घेतला आहे. तृणमूलच्या या निर्णयाला विरोधी पक्षांकडून समर्थन देण्यात आलं आहे.
तृणमूल काँग्रेसनं पश्चिम बंगालमध्ये सुरु असलेल्या एसआयआरमधील अनियमिततांचं कारण देत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. या प्रस्तावाची घोषणा तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत रॉय यांनी केली. संविधानाच्या कलम 324 नुसार ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात महाभियोग प्रस्ताव आणला जाईल, असं ते म्हणाले. आम्ही महाभियोग प्रस्ताव मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात राज्य घटनेच्या कलम 342 नुसार आणत आहोत. कुमार यांच्या कामकाजाबद्दल अनेक तक्रारी असल्याचं सौगत रॉय यांनी म्हटलं.
रॉय पुढं म्हणाले की पश्चिम बंगालमध्ये 59 लाख मतदार 'अॅज्युडिकेशन' यादीत म्हणजेच न्यायनिर्णय प्रक्रियेत असून ही खूप मोठी संख्या आहे. ममता बॅनर्जी जे म्हणत आहेत ते बरोबर आहे. आम्ही येत्या काही दिवसांमध्ये ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात महाभियोग प्रस्ताव आणत आहोत, असं रॉय म्हणाले.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं तृणमूल काँग्रेसच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. काँग्रेसचे खासदार उदित राज यांनी महाभियोग प्रस्तावाला पाठिंबा देऊ असं म्हटलं आहे. महाभियोग प्रस्ताव ही स्वागतार्ह बाब आहे, आम्ही या मुद्यावर काही काळ संघर्ष केला आहे, असंही ते म्हणाले. काँग्रेस खासदार सुखदेव भगत यांनी देखील एसआयआर राबवण्याच्या प्रक्रियेवर टीका केली. काँग्रेसला पाठिंबा देणारे अपक्ष खासदार पप्पू यादव यांनी देखील मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात कारवाईची मागणी केली. समाजवादी पार्टीचे खासदार धर्मेंद्र यादव यांनी देखील टीएमसीच्या प्रस्तावाचं स्वागत केलं आहे. याशिवाय त्यांनी महाभियोग प्रस्तावावेळी तृणमूल काँग्रेससोबत राहणार असल्याचं म्हटलं.
दरम्यान, भाजप नेत्यांकडून मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात आणल्या जाणाऱ्या महाभियोग प्रस्तावाविरोधात भूमिका मांडण्यात आली. मुख्तार अब्बास नक्वी, केंद्रीय मंत्री सुकांता मुजुमदार, भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी महाभियोग प्रस्तावावरुन काँग्रेस आणि विरोधी पक्षांवर टीका केली. आता तृणमूल काँग्रेस मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव कधी आणणार हे पाहावं लागेल.