मुंबई : भारतीय शेअर बाजारात आज मोठ्या प्रमाणात विक्रीचं सत्र राहिल्यानं सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली. तीन दिवस तेजीत असलेल्या शेअर बाजारात घसरण दिसून आली. भारतीय शेअर बाजारावर अमेरिका- इस्त्रायल आणि इराण युद्धाचा मोठा परिणाम दिसून आला. आज सेन्सेक्स तब्बल 2496.89 अंकांनी घसरुन 74207.24 अंकांवर बंद झाला. तर, निफ्टी 50 मध्ये देखील 775.65 अंकांनी घसरण होऊन निर्देशांक 23002.15 अंकांवर बंद झाला.
सेन्सेक्सवरील घसरणीप्रमाणं बीएसई मिडकॅप 150 निर्देशांक 3 टक्क्यांनी तर बीएसई 250 स्मॉलकॅप निर्देशांक 2.6 टक्क्यांनी घसरला आहे. शेअर बाजारातील आजच्या घसरणीमुळं गुंतवणूकदारांचं तब्बल 12 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 439 लाख कोटींवरुन 427 लाख कोटींवर आलं आहे. म्हणजेच एका दिवसात गुंतवणूकदारांचे 12 लाख कोटी रुपये बुडाले आहेत.
भारतीय शेअर बाजारातील घसरणीचं प्रमुख कारण अमेरिका- इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध आणखी तीव्र होणं हे देखील आहे. 28 फेब्रुवारीपासून सुरु झालं युद्ध अद्याप संपलेलं नाही. यामुळं जागतिक बाजारावर परिणाम झाला आहे. इस्त्रायलनं इराणच्या सर्वात मोठ्या एलएनजी रिफायनरीवर हल्ले केले आहेत. त्याला इराणनं देखील प्रत्युत्तर दिलं आहे.
ब्रेंट क्रूड ऑईलचे दर देखील 115 अमेरिकन डॉलर प्रति बॅऱलच्या वर पोहोचले आहेत. यामुळं शेअर बाजारावर परिणाम झाला आहे. ब्रेंट क्रूड ऑईलचा एका बॅरलचा दर 118 डॉलर इतका झाला आहे. आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धात ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले सुरु करण्यात आल्यानं त्याचा परिणाम क्रूड ऑईलच्या दरावर झाला आहे. ब्रेंट क्रूड ऑईलचे दर 110 डॉलर प्रति बॅरलच्या वर काही दिवस राहिल्यास भारताच्या जीडीपीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, असा अंदाज जाणकारांनी वर्तवला आहे.
एचडीएफसी बँकेचे चेअरमन अतनू चक्रवर्ती यांनी राजीनामा दिल्यानं बँकेच्या शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये एचडीएफसीच्या शेअरनं 52 आठवड्यांचा निचांक गाठला होता. आरबीआयनं एचडीएफसी बँकेसंदर्भात स्पष्टीकरण दिल्यांनतर शेअरमध्ये सुधारणा झाली. बाजार बंद झाला तेव्हा एचडीएफसीचा शेअर 798.20 रुपयांवर पोहोचला होता.
अमेरिकन फेड रिझर्व्हनं 18 मार्चला पतधोरण जाहीर करताना व्याज दर कायम ठेवले.आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या संघर्षामुळं आव्हानात्मक स्थिती निर्माण झाल्यानं त्याचा अमेरिकन अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळं फेड रिझर्व्हनं व्याज दरात कपात केलेली नाही.
भारताचा रुपया देखील डॉलरच्या तुलनेत आज आणखी कमजोर झाल्याचं पाहायला मिळालं. डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य 26 पैशांनी कमी होऊन 92.6375 रुपयांवर पोहोचलं आहे. याशिवाय विदेशी गुंतवणूकदारांकडून भारतीय बाजारात जोरदार विक्री सुरुच आहे. भारतीय शेअरची विक्री करुन विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार पैसे काढून घेत आहेत. यामुळं भारतीय शेअर बाजाराला मोठा फटका बसला आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
आणखी वाचा