तुरुंगातून सुटका होणार : दुलारचंद यादव हत्या प्रकरणात दिलासा
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
मोकामा येथील जनता दल (युनायटेड) चे आमदार अनंत सिंग यांना दुलारचंद यादव हत्या प्रकरणात जामीन मंजूर झाला आहे. आता सिंग यांची लवकरच तुरुंगातून सुटका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुलारचंद यादव हत्या प्रकरणात सिंग यांना 1 नोव्हेंबर 2024 रोजी त्यांच्या मोकामा येथील निवासस्थानातून अटक करण्यात आली होती. रात्रीच्या वेळी मोठ्या पोलीस बंदोबस्तात त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. आता त्यांना या प्रकरणात जामीन मंजूर झाला आहे.
गेल्या वर्षी 30 ऑक्टोबर रोजी बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान मोकामा येथे दुलारचंद यादव यांची हत्या झाली होती. या हत्येप्रकरणी अनंत सिंग आणि त्यांच्या समर्थकांवर आरोप ठेवण्यात आले होते. यानंतर तत्कालीन एसएसपी कार्तिकेय शर्मा यांनी कारवाई करत त्यांना अटक केली. बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान बरह येथे झालेल्या प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाचे कार्यकर्ते दुलारचंद यादव यांच्या हत्येशी संबंधित हे प्रकरण त्यावेळी बरेच गाजले होते.