राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. अशोक खरात प्रकरणात राज्यभरातून संताप व्यक्त केला जात होता. विरोधकांकडून सातत्याने राजीनाम्याची मागणी केली जात होती. त्यानंतर आज शुक्रवारी रुपाली चाकणकर यांनी राजीनाम्याचे पत्र उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सुपूर्त केलं. रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राजीनामा दिल्यानंतरही माज उतरलेला नाही, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली. वडेट्टीवार म्हणाले, राज्यातील सर्वाधिक अकार्यक्षम महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला आहे. पण राजीनामा देताना त्यांचा माज उतरलेला नाही. त्यांनी स्वेछेने वैयक्तिक कारणासाठी राजीनामा देत असल्याचा उल्लेख त्यांनी पत्रात केलाय'.
' त्यांनी अशोक खरात प्रकरणात महिलांवर,पत्रकारांवर टाकलेला दबाव या प्रकरणी पोलीस तक्रार होऊ नये म्हणून केलेले उद्योग याचा कुठलाही खेद,चूक झाली असं त्यांना वाटत नाही. राजीनामा देताना पण उपकार असल्यागत चाकणकर यांचे वागणे निषेधार्ह आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.
'चाकणकर हा छोटा मासा आहे. यात अजून किती मंत्री होते कोणी या बलात्कारी बाबाला राजाश्रय दिला, वाचवण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे. खरात प्रकरण दाबण्यासाठी कोणत्या नेत्यांनी,मंत्र्यांनी फोन केले याचीही चौकशी होऊन कारवाई झाली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.