Domestic Gas Cylinder Misused by Hotels : हॉटेलमध्ये घरगुती गॅस; भरारी पथक सुस्त
esakal March 21, 2026 10:45 AM

पिंपरी : अमेरिका-इराण यांच्यातील संघर्षाचे पडसाद आखाती देशांमध्ये उमटत असल्याने गॅसपुरवठा साखळी विस्कळित झाली आहे. शहरात एलपीजी सिलिंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. टंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाने व्यावसायिक वापराच्या सिलिंडरचे वितरण बंद केले आहे. त्यामुळे काही हॉटेल आणि खाद्यपदार्थ विक्रेते सर्रास घरगुती गॅस सिलिंडरचा वापर करत आहेत.

हा गैरवापर रोखण्यासाठी नेमलेले चार जणांचे भरारी पथक अद्याप सुस्त असल्याची नागरिकांची तक्रार आहे. परिणामी, घरगुती गॅस सिलिंडर मिळेनासे झाल्याने अनेक नागरिकांचा संताप वाढला आहे. परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे प्रशासन सांगत असले तरी प्रत्यक्षात भरारी पथक कारवाईसाठी धजावत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.

हॉटेल व अन्य व्यावसायिकांना व्यावसायिक सिलिंडरचे वितरण बंद आहे. त्यामुळे अशा व्यावसायिकांची चिंता वाढली आहे. अनेक हॉटेल बंद पडण्याच्या मार्गावर आहे. काही हॉटेलांत चुलीचा वापर सुरू झाला आहे.

दुसरीकडे शहरातील अनेक गल्लीबोळातील हॉटेल व्यावसायिक, चहाच्या टपऱ्या आणि नाश्ता विक्रेत्यांनी काळा बाजार करून घरगुती सिलिंडर खरेदी केले आहे. नियमानुसार घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर करणे हा गुन्हा असूनही संत तुकाराम नगर, मासुळकर कॉलनी, कासारवाडी, फुगेवाडी, भोसरी, निगडी, काळेवाडी, रावेत आदी भागांत काही हॉटेल, चायनीज व अन्य पदार्थ विक्रेते घरगुती गॅस सिलिंडरचा वापरत आहेत.

सलग १६ व्या दिवशी रांगा

घरगुती सिलिंडर मिळविण्यासाठी सलग १६ व्या दिवशी नागरिकांच्या रांगा लागल्या. घरगुती सिलिंडरचा व्यावसायिक वापर होत असल्याच्या तक्रारी पुरवठा विभागाकडे येत आहेत. यासाठी पुरवठा विभागाने तपासणी मोहीम हाती घेतली आहे. मागील आठवड्यात कासारवाडीतील एका एजन्सीवर कारवाई केली होती. ती वगळता अद्याप कारवाई थंडावलेली दिसत आहे.

नागरिकांच्या तक्रारींच्या अनुषंगाने भरारी पथकाने हॉटेलांची तपासणी सुरू केली आहे, तसेच गॅस एजन्सीमधील ग्राहकांची बुकिंग तपासत आहोत. सिलिंडरने भरलेल्या टेम्पो तपासत असून टाकीचे वजन तपासत आहोत. भरारी पथकाची पिंपरी आणि भोसरी भागात नजर आहे.

- डॉ. विजयकुमार क्षीरसागर, परिमंडळ अधिकारी, चिंचवड

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.