Paduka Darshan Sohala : मुंबईत आजपासून 'भक्तीचा महाकुंभ'; स्वामी स्वरूपानंद यांच्या हस्ते उद्घाटन; श्री एम यांचीही उपस्थिती
esakal March 21, 2026 10:45 AM

मुंबई - ‘सकाळ माध्यम समूहा’ने आयोजित केलेल्या श्रीगुरू पादुका दर्शन उत्सवासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी नोंदणी केली असून वेगवेगळ्या सोयी-सुविधांनी ‘भक्तीचा महाकुंभ’ सज्ज झाला आहे. या सोहळ्याला शनिवारपासून (ता. २१) सुरुवात होत आहे. संत आणि सद्गुरूंच्या पादुका आज भक्तिमय वातावरणात टाळ-मृदुंगांच्या गजरात वरळीत दाखल झाल्या आहेत.

श्रीगुरू पादुका दर्शन उत्सवाच्या नोंदणीला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून ‘भक्तीचा महाकुंभ’ भाविकांच्या गर्दीने फुलणार हे निश्चित झाले आहे. एकाच छताखाली संत आणि सद्गुरूंच्या २१ पादुकांचे दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे.

वरळीतील एनएससीआय डोम या सोहळ्यासाठी सज्ज झाला असून संत आणि सद्गुरूंच्या २१ पादुकांसाठी आकर्षक मंदिरे साकारली आहेत. विविध कार्यक्रमांची तयारी पूर्ण झाली आहे. या महाकुंभाचे सकाळी १० वाजता चिन्मय मिशनचे आंतरराष्ट्रीय प्रमुख स्वामी स्वरूपानंद यांच्या हस्ते व आध्यात्मिक, योगगुरू श्री एम यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन होणार आहे.

Paduka Darshan Sohala

याप्रसंगी स्वामी स्वरूपानंद हे मार्गदर्शन करणार आहेत. या सोहळ्यासाठी राज्यभरातील भाविक, विविध संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रांतील मान्यवरांसह सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत. पुढील दोन दिवस दर्शनासाठी भाविकांचा ओघ कायम राहणार आहे. दुपारी विविध भजने सादर केली जाणार आहेत. त्यानंतर संतुलन आर्युवेदचे व्यवस्थापकीय संचालक सुनील तांबे यांच्या उपस्थितीत सायंकाळी सहा वाजता सामूहिक ध्यानधारणा केली जाणार आहे.

या सोहळ्यासाठी विविध माध्यमांतून सर्वापर्यंत निमंत्रण पोहोचवण्यात आले आहे. सर्वांनी सहकुटुंब येऊन श्रीपादुकांचे दर्शन घ्यावे असे, आवाहनही करण्यात आले आहे. भाविकांना निर्विघ्नपणे श्रीपादुकांचे दर्शन व्हावे म्हणून ऑनलाइन नोंदणी सुरू आहे. त्यासाठी भाविकांना सोबतचा क्यूआर कोड स्कॅन करून आपला प्रवेश निश्चित करता येणार आहे.

या महोत्सवादरम्यान रविवारी (ता. २२) सकाळी १० वाजता श्री एम यांचे व्याख्यान होणार आहे. या सोहळ्यात वारकरी टाळमृदंगासह सहभागी होणार असून, रिंगणासह भक्तिसंगीताने हा महोत्सव सजवणार आहेत. विविध भजनी मंडळे, देवस्थाने, विविध संस्थांचे कार्यकर्ते समूहाने सहभागी होऊन या भक्तिसंगमाचा आनंदोत्सव साजरा करणार आहेत.

मनोरंजनसृष्टीतील सेलिब्रिटींसह उद्योगसंस्था, विविध कार्यालयातील कर्मचारी, ज्येष्ठ नागरिकांसह तरुणाईही या भक्तिसोहळ्याचे साक्षीदार होणार आहे. या महोत्सवासाठी डोम एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे विशेष सहकार्य लाभले आहे.

विराज जोशी यांची गायनसेवा

स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांचे नातू विराज जोशी या महोत्सवात शनिवारी (ता. २१) रात्री ७ ते ८ या वेळेत अभंग सेवा सादर करणार आहेत. त्याच्या ‘बियाँड बंदिश’ या फ्यूजन कार्यक्रमाला रसिकांनी दाद दिली होती. त्यांनी पुण्यातील भीमसेन सवाई गंधर्व महोत्सवामध्ये वयाच्या केवळ १४ व्या वर्षी गायन केले आहे.

भाविकांसाठी सुविधा

  • सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क नाही

  • मुख्य प्रवेशद्वार, नोंदणी करून आलेल्या भाविकांना ‘क्यूआर’ कोड स्कॅन करणारे कक्ष

  • पादत्राणांसाठी मंडपाबाहेर विशेष कक्षाची व्यवस्था

  • साधकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था

  • ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग किंवा चालता येत नाही अशा भाविकांसाठी व्हीलचेअर

  • दर्शनार्थींच्या मदतीसाठी मंडपामध्ये गुरुसेवक सज्ज

  • उत्सवात पोहोचण्यासाठी महालक्ष्मी (पश्चिम रेल्वे), भायखळा (मध्य रेल्वे) ही नजीकची उपनगरी रेल्वे स्थानके असून, कार्यक्रम स्थळाशेजारी नेहरू तारांगण हे बेस्टचे बस स्थानक आहे.

या संतांच्या पादुकांचे दर्शन घेता येणार

१) ज्ञानेश्वर महाराज (श्री क्षेत्र नेवासा, जि. अहिल्यानगर)

२) संत मुताई (श्री क्षेत्र मुक्ताईनगर)

३) संत नामदेव महाराज (श्री क्षेत्र घुमान, पंजाब)

४) संत जनाबाई (श्री क्षेत्र गंगाखेड, जि. परभणी)

५) संत नरहरी महाराज (श्री क्षेत्र पंढरपूर)

६) संत सेना महाराज (श्री क्षेत्र पंढरपूर)

७) संत सावता महाराज (संत शिरोमणी सावता महाराज चॅरिटेबल ट्रस्ट, श्री क्षेत्र अरण, जि. सोलापूर)

८) संत एकनाथ महाराज (श्री रघुनाथ बुवा गोसावी, पालखीवाले, श्री क्षेत्र पैठण)

९) संत तुकाराम महाराज (भंडारा डोंगर, जि. पुणे)

१०) संत निळोबाराय महाराज (श्री क्षेत्र पिंपळनेर, जि. अहिल्यानगर)

या सद्गुरूंच्या पादुकांचे दर्शन घेता येणार

११) महाअवतार बाबाजी

१२) श्री स्वामी समर्थ (चिन्मय पादुका मठ, गुरुमंदिर, अक्कलकोट)

१३) श्री साईबाबा (देशपांडे निमोणकर परिवार, निमोणे, संगमनेर, जि. अहिल्यानगर)

१४) श्री गजानन महाराज (दिनेशकुमार देशमुख, जयपूर, जि. बुलडाणा)

१५) समर्थ रामदास स्वामी (दिवाकर देशपांडे, महाबळेश्वर मठ)

१६) टेंबे स्वामी महाराज (शरदशास्त्री जोशी, वासुदेव निवास, पुणे)

१७) गोंदवलेकर महाराज (गुरुनाथ हरिभट्ट, बंगळूर)

१८) शंकर महाराज (पोपटदादा हिरे, अंतापूर, जि. नाशिक)

१९) संत जलाराम बाप्पा (श्री जलाराम सत्संग मंडळ, चौटीला, गुजरात)

२०) सद्गुरू गजानन महाराज (विश्व फाउंडेशन, शिवपुरी, अक्कलकोट)

२१) श्रीगुरू बालाजी तांबे (संतुलन आश्रम, कार्ला, लोणावळा)

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.