अत्याधुनिक न्यूरोसर्जरी संस्थेची मुलुंडमध्ये सुरुवात
राष्ट्रीय कॉन्क्लेवमध्ये तज्ज्ञांचा मेळावा
मुलुंड, ता. २१ (बातमीदार) : मुलुंड येथील फोर्टिस इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सेस मुलुंडच्या वतीने आयोजित पहिल्या वार्षिक न्यूरोसायन्स कॉन्क्लेवच्या पार्श्वभूमीवर मिनिमली इनवेसिव ब्रेन आणि स्पाइन सर्जरी संस्थेचे उद्घाटन वांद्रे येथील ताज हॉटेलमध्ये शनिवारी (ता. २१) पार पडले. मेंदू व मणक्याशी संबंधित आजारांवर अत्याधुनिक आणि कमी आघात करणाऱ्या उपचारपद्धती उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेली ही संस्था शहरातील विशेषीकृत न्यूरोकेअर क्षेत्रात महत्त्वाचा टप्पा ठरत आहे.
या नव्या संस्थेचे नेतृत्व फोर्टिस मुलुंड येथील डॉ. जयेश सरधारा करणार असून, ते फोर्टिस हॉस्पिटल मुंबईतील संबंधित विभागाचे संचालक आहेत. उद्घाटन सोहळ्यास डॉ. विष्णू पाणीग्रही, फोर्टिस मुलुंडच्या आणि महाराष्ट्राच्या व्यवसाय प्रमुख डॉ. एस. नारायणी, फॅसिलिटी डायरेक्टर डॉ. विशाल बेरी यांच्यासह वैद्यकीय आणि प्रशासकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. ‘एडव्हान्स्ड न्यूरोसायन्सेसवरील वर्तमान अपडेट’ या संकल्पनेवर आधारित दोनदिवसीय कॉन्क्लेवमध्ये देशभरातील नामांकित न्यूरोलॉजिस्ट, न्यूरोसर्जन आणि आरोग्य क्षेत्रातील आदी तज्ज्ञांनी आपला सहभाग नोंदवला. या व्यासपीठावर न्यूरोलॉजी, न्यूरोसर्जरी, न्यूरो-इंटरव्हेन्शन, न्यूरो-ऑन्कोलॉजी, स्पाइन सर्जरी आणि न्यूरो-क्रिटिकल केअर या क्षेत्रांतील नव्या तंत्रज्ञान व उपचारपद्धतींवर सखोल चर्चा झाली.
वैज्ञानिक कार्यक्रमात व्याख्याने, शस्त्रक्रियांची प्रात्यक्षिके, पॅनेल चर्चा आणि संवादात्मक सत्रांचा समावेश होता. विशेषतः स्ट्रोक व्यवस्थापन, न्यूरो-ऑन्कोलॉजी आणि मिनिमली इनवेसिव सर्जरी या विषयांवर अधिक भर देण्यात आला. डॉ. सरधारा यांनी न्यूरोसर्जरी क्षेत्रातील झपाट्याने होणाऱ्या प्रगतीवर प्रकाश टाकत, कमी वेदनादायी व जलद पुनर्प्राप्ती देणाऱ्या तंत्रज्ञानाचे महत्त्व उपस्थितांना पटवून दिले. तसेच, डॉ. बेरी आणि डॉ. नारायणी यांनी या कॉन्क्लेवच्या माध्यमातून शैक्षणिक सहकार्य वाढवून रुग्णसेवेची गुणवत्ता अधिक उंचावण्याचा निर्धार व्यक्त केला. विविध तज्ज्ञांच्या सहभागामुळे अंतरविभागीय समन्वयाला चालना मिळणार असून, देशातील न्यूरोकेअर अधिक सक्षम करण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे.