हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक अभिनेत्री आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत आल्या आहेत. त्यापैकीच एक नाव म्हणजे राणी मुखर्जी. कमी वयातच करिअरची सुरुवात करून राष्ट्रीय पुरस्कारापर्यंतचा प्रवास करणारी ही अभिनेत्री आजही बॉलिवूडमधील अग्रगण्य कलाकारांपैकी एक मानली जाते.
21 मार्च 1978 रोजी जन्मलेल्या राणी मुखर्जीचे वडील राम मुखर्जी हे नामांकित दिग्दर्शक-निर्माते होते, तर आई कृष्णा मुखर्जी या प्लेबॅक सिंगर होत्या. त्यामुळे लहानपणापासूनच तिला चित्रपटसृष्टीचा वारसा लाभला.
राणी मुखर्जी केवळ 16 व्या वर्षी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. तिने 'राजा की आयेगी बारात' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या फारसा यशस्वी ठरला नाही. मात्र राणीच्या अभिनयाची दखल घेतली गेली.
1998 हे वर्ष तिच्या करिअरसाठी टर्निंग पॉइंट ठरले. 'गुलाम' या चित्रपटात तिने आमिर खानसोबत काम केले आणि प्रेक्षकांची मनं जिंकली. त्याच वर्षी Kuch Kuch Hota Hai या सुपरहिट चित्रपटात तिने महत्त्वाची भूमिका साकारली. या चित्रपटासाठी तिला पहिला फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला.
यानंतर तिने आपल्या कारकिर्दीत एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले. तिने अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, सैफ अली खान यांसारख्या अनेक सुपरस्टार्ससोबत काम केले आहे.