ते बहात्तर दिवस
डॉ. अविनाश सोवनी लिखित एक लघुकथा, दोन दीर्घकथा आणि एक प्रदीर्घ कथा अशा एकूण चार कथांचा हा छोटेखानी संग्रह आहे. या संग्रहात हळव्या प्रेमकथा नाहीत किंवा अवतीभोवतीचे भयाण वास्तव दाखवणाऱ्या टोकाच्या सामाजिक सत्यकथाही नाहीत. बऱ्याचशा ‘फँटसी’ किंवा कल्पनारम्यतेकडे झुकणाऱ्या, परंतु वाचकांना ‘असं खरंच घडायला हवं होतं का?’ असा विचार करायला लावणाऱ्या कथा आहेत. या कथा वाचकाला अंतर्मुख करणाऱ्या आहेत; पण त्याचबरोबर त्याचे घटकाभर मनोरंजनही करणाऱ्या आहेत. या कथा वाचताना अशा घटना भूतकाळात कधी घडल्या नाहीत किंवा वास्तवात कधी घडतील असे वाटत नाही, असं मत वाचकाचं होतं. मात्र, लेखक म्हणतात त्या प्रमाणे अशा घटना भविष्यात घडणारच नाहीत असंही नाही.
प्रकाशक : उन्मेष प्रकाशन, पुणे पृष्ठे : १६० मूल्य : ३०० रु.
अक्षरछाया
जागतिक राजकारणाचे अभ्यासक, समाजकारणाचे भाष्यकार, कथा-कादंबरीकार... अशा विविध भूमिकांमधून दर्जेदार लेखन करणारे ख्यातनाम मराठी साहित्यिक वि. ग. कानिटकर यांच्या निवडक साहित्याचे संकलन असलेला ‘अक्षरछाया’ हा ग्रंथ नुकताच प्रकाशित झाला आहे. कानिटकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त हा ग्रंथ वाचकांच्या भेटीस आला आहे. मंगला गोडबोले, निरंजन आगाशे आणि प्रिया निघोजकर यांनी या ग्रंथाचे संपादन केले आहे. आप्तेष्टांच्या स्मरणातले कानिटकर, कथाकार-कादंबरीकार कानिटकर, इतिहास, युद्धे व नेतृत्व आणि चतुरस्र लेखक या चार विभागांचा ग्रंथात समावेश आहे. हा ग्रंथ म्हणजे कानिटकरांच्या लेखनाचे विविध पैलू उलगडण्याचा स्तुत्य प्रयत्न आहे.
वैशिष्ट्य : कानिटकरांचा पत्रप्रपंच, प्रकाशित ग्रंथसंपदा, दुर्मीळ छायाचित्रांचा समावेश. प्रकाशक : राजहंस प्रकाशन, पुणे पृष्ठे : ३२४ मूल्य : ७५० रु.
लाइफस्टाइल
शांभवी मंगेश जोशी यांचा हा कथासंग्रह वाचकांच्या भेटीस आला आहे. संवेदनशीलता हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे. मानवी जीवनाचे भावविश्व उलगडणाऱ्या ह्या कथा वाचकाला खिळवून ठेवतात. ‘जस्ट बी’ ही कथा लहान मुलांची मानसिकता उलगडते. ‘प्रकाशाच्या सावल्या’ या कथेतील आध्यात्मिक वातावरण व त्यातील नायकाची मनोवस्था उत्तमरीत्या मांडण्यात आली आहे. ‘सॅटर्डे सेन्शंट’ ही कथा वाचताना मन सुन्न होतं. प्रत्येक कथेला स्वतःचे वेगळेपण आहे आणि त्यातील कथानक एका वेगळ्या मुद्द्याला हात घालणारे आहे. एकूण २१ कथांचा संग्रहात समावेश आहे.
प्रकाशक : मधुश्री प्रकाशन, पुणे पृष्ठे : २१४ मूल्य : ४२५ रु.
दलाल्स स्ट्रीट
शेअर्सच्या किमतीतील चढ-उतारांचं अधिराज्य असलेल्या बाजारातल्या मानवी संबंधातील गुंतागुंतीच्या क्रिया-प्रतिक्रिया आणि डाव-प्रतिडाव यांचा साक्षीदार म्हणजे ‘दलाल स्ट्रीट’. या ऐतिहासिक स्थळाचे महत्त्व आणि तेथील विविध घडामोडींचं विश्व उलगडणारी कादंबरी म्हणजे ‘दलाल्स स्ट्रीट’. अनुराग त्रिपाठी यांनी ही कादंबरी लिहिली असून, स्नेहलता जोशी यांनी अनुवाद केला आहे. सर्व अग्निपरीक्षांतून पार होणाऱ्या नायकाच्या उदयाचं चित्र या कादंबरीत आहे. कथानकात आर्थिक थरार रंगवलेला आहे. इथल्या अस्तित्वाच्या लढाईत जिवलग मित्रच कसे कट्टर प्रतिस्पर्धी बनतात, हे दाखवण्यात आलं आहे. पैसा आणि भविष्य पणाला लावून दुसऱ्यावर कुरघोडी करून झटपट जिंकायचं, हीच या जगाची रीत असते हे सत्य कादंबरी पुन्हा एकदा अधोरेखित करते.
वैशिष्ट्य : ओघवती भाषाशैली. शेअर बाजारातील विविध संदर्भ.
प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे पृष्ठे : २३४ मूल्य : ४२० रु.
अंधारातील दिवस
‘अंधारातील दिवस’ हा लेखिका तसलिमा नासरिन यांच्या आत्मचरित्राचा चौथा भाग आहे. आमार मेयेबला, उधाण वारा आणि द्विखंडित यानंतर हा भाग वाचकांच्या भेटीस आला आहे. ‘पॅरिसची डायरी’, ‘तांडव’, ‘गृहबंदी’, ‘देशांतर’ अशा चार प्रकरणांमध्ये हे पुस्तक विभागलेले आहे. कोलकात्यातील एका दैनिकाला त्यांनी दिलेल्या मुलाखतीतील ‘शरीयतमध्ये बदल व्हायला हवेत’ हे विधान चुकीचं छापलं गेल्याने बांग्लादेशात त्यांच्याविरुद्ध मूलतत्त्ववाद्यांनी सुरू केलेलं आंदोलन, त्यांच्याविरुद्ध सरकारने काढलेलं अटक वॉरन्ट, अटक टाळण्यासाठी स्वतःच्याच देशात दोन महिने लपून राहण्याचा अनुभव, लपून राहण्यात हितचिंतकांनी केलेली मदत याबद्दल नासरिन यांनी सविस्तरपणे लिहिलं आहे. अखेर सरकार नासरिन यांना देश सोडून जाण्यास भाग पाडतं. त्याबद्दलचं ‘देशांतर’ हे प्रकरण वाचताना कुठल्याही संवेदनशील वाचकाचं हृदय हेलावल्याशिवाय राहणार नाही.
प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे पृष्ठे : ४२४ मूल्य : ६९५ रु.
New Marathi Book : मानवी संवेदनांचे सूक्ष्म चित्रण करणाऱ्या १३ कथांचा 'स्वामित्वलेखिका' संग्रहहरिश्चंद्राच्या फॅक्टरीतील रत्ने
मराठी चित्रपटसृष्टीत घडत गेलेल्या स्थित्यंतराचा व्यक्तिचित्रणात्मक आलेख, त्या त्या काळातील सामाजिक परिस्थिती, सिनेतंत्रज्ञानाचे बदलते स्वरूप, चित्रपट रसिकांची बदलती अभिरुची, जागतिक घडामोडी, बदललेली जीवनमूल्ये; तसेच चित्रपटनिर्मिती प्रक्रियेतील विविध घटक याचा सविस्तर धांडोळा श्रीराम येरंडे यांनी आपल्या ‘हरिश्चंद्राच्या फॅक्टरीतील रत्ने’ या पुस्तकात घेतला आहे. मनोरंजनाबरोबरच प्रेक्षकांना जे हवं ते देण्याचा प्रयत्न किंवा व्यवसायापलीकडे जाऊन, आर्थिक निकष बाजूला ठेवून एखादा विचार पोहचविण्याच्या वेगळ्या वाटेने जाण्याचे केलेले प्रयत्न यांची दखल या पुस्तकात घेण्यात आली आहे. दादासाहेब फाळके ते विजय कदम अशा सुमारे ४१ व्यक्तिमत्त्वांवर येरंडे यांनी लेखन केले आहे. १९६० ते १९९० या कालखंडात चित्रपटसृष्टी गाजवलेल्या अनेक नररत्नांचा जीवनप्रवास वाचकांना वाचायला मिळणार आहे.
प्रकाशक : यशोदीप पब्लिकेशन्स, पुणे पृष्ठे : १६८ मूल्य : २५० रु.
आमची शेती... आमचे सोबती...
आधुनिक मराठी साहित्यातील ललितगद्य प्रकारात कृषिजीवनाविषयी फारसे लिखाण आढळत नाही ही तक्रार काही अंशी कमी करू शकणारे लेखन म्हणजे ‘आमची शेती... आमचे सोबती...’ हे पुस्तक होय. स्वाती कर्वे आणि त्यांचे यजमान सुनील खरे यांनी सहलेखनातून हे पुस्तक साकारले आहे. मध्यमवर्गीय आयुष्य जगून नोकरी-व्यवसाय लवकर सोडून त्यानंतर त्यांनी जाणीवपूर्वक शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे हे लेखन म्हणजे केवळ ‘सेकंड होम’स्वरूपाचे नाहीत, तर कायम तिथेच राहून शेतीतले खाचखळगे, अडचणी यांना तोंड देत स्वतः पिकवून खाण्याचे अनुभव आहेत, त्यातला आनंद आहे. आर्थिक हिशेब मात्र नाहीत. या प्रयोगातील सकारात्मकता तरुणांना प्रेरणादायी ठरणारी आहे.
वैशिष्ट्य : शेतीचे संदर्भ व नव्या प्रयोगांचा उल्लेख.
प्रकाशक : स्वीटी पब्लिकेशन्स पृष्ठे : १४४ मूल्य : २२० रु.
अंत हाच आरंभ
आपल्या मनाचे सारे विभ्रम दूर करून, एक वेगळे विश्व कुठे ना कुठे आपल्याला खुणावत असते. त्या विश्वाशी साधलेला एक अनोखा संवाद उलगडणारे पुस्तक म्हणजे जुई खोत लिखित ‘अंत हाच प्रारंभ’! प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात चांगले-वाईट अनुभव येत असतात. त्यातील काही आपल्या आकलनशक्तीच्या पलीकडे असतात. अशा प्रसंगी आध्यात्मिक शक्तीची जाणीव होते. साधनामार्गातील व्यक्तींना असे अनुभव येतात. मात्र, ते सर्वांनाच शब्दबद्ध करता येत नाही. जुई खोत यांनी त्यांना आलेले दैनंदिन जीवनातील आणि आध्यात्मातील असेच विविध अनुभव ओघवत्या शैलीत मांडले आहेत. वाचकांना त्यातून नवी दिशा मिळेल.
प्रकाशक : अमित प्रकाशन, पुणे
पृष्ठे : २१८ मूल्य : ३९९ रु.