Warje News : वारज्यातील नवीन पूल खुला
esakal March 22, 2026 10:45 AM

पुणे : मुंबई-बंगळूर महामार्गावरील वडगाव पूल ते वारजे दरम्यान होणाऱ्या भीषण वाहतूक कोंडीतून प्रवाशांची आता सुटका होणार आहे. महामार्ग प्राधिकरणाने या मार्गावरील मुठा नदीवर बांधलेल्या नवीन पुलाचा मुंबई ते सातारा दिशेकडील भाग वाहतुकीसाठी खुला केला आहे. यामुळे वाहतूक कोंडीतून प्रवाशांना दिलासा मिळणार असून प्रवाशांच्या वेळेत मोठी बचत होणार आहे. याचा थेट फायदा दैनंदिन प्रवास करणाऱ्या सुमारे ६० ते ७० हजार वाहनचालकांना होणार आहे. ‘सकाळ’ने हा विषय सातत्याने लावून धरला होता.

Latest Marathi News Live Update: राज्यासह देशभरात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

मुठा नदीवरील अरुंद पुलामुळे या भागातून जाणाऱ्या वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः गर्दीच्या वेळी येथून जाणे म्हणजे वाहनचालकांच्या संयमाची परीक्षा पाहणे अशीच स्थिती होती. वाहनचालक वडगाव पुलावरून खाली आल्यानंतर लगेच बॉटलनेक तयार होत असल्याने मुठा नदीचा पूल ओलांडून जाण्यास किमान ४० ते ५० मिनिटांचा वेळ लागत असे. यात अपघात झाला किंवा एखादे वाहन बंद पडले, तर स्थिती आणखीच गंभीर होत होती. त्यामुळे महामार्ग प्राधिकरणाने पुलाचे विस्तारीकरण करण्याचे काम सुरू केले होते. त्याच्या एका बाजूचे काम पूर्ण झाले असून साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी पुलाचा भाग खुला होण्यास आणखी किमान दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

तिन्ही मार्गिकांवरून वाहतूक

चांदणी चौकातील वाहतूक कोंडीतून पुणेकरांची सुटका करण्यासाठी सुमारे ३५० कोटी रुपये खर्चून आठ रॅम्प, दोन बोगदे व एकूण १७ किलोमीटर लांबीचे रस्ते केले. परिणामी येथील वाहतूक कोंडी संपली. मात्र या कोंडीचे स्थलांतर मुठा नदीवरील पूल परिसरात (वारजे पूल) झाले होते. सायंकाळी या पुलावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. आता मात्र पुलाची एक बाजू सुरू झाल्याने पुलावरील तिन्ही मार्गिकांवरून वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे. यामुळे प्रवाशांच्या वेळेत किमान ३० ते ४० मिनिटांची बचत झाली आहे.

नागरिकांना मोठा दिलासा

मुंबई - बंगळूर महामार्गावरील बाह्यवळणाचा व अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणून मुठा नदीवरील पूल - वडगाव पूल आणि नवले पुलाचा भाग ओळखला जातो. पुणे शहरातील चांदणी चौक, वारजे, वडगाव, सिंहगड रस्ता या भागांतील नागरिकांच्या जीवनमानावर या रस्त्याचा मोठा प्रभाव आहे. जड वाहनांसह अन्य वाहनांची या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. या रस्त्याची वहन क्षमता सुमारे एक लाख आहे. मात्र प्रत्यक्षात सुमारे दीड लाख वाहने या रस्त्यावरून धावतात. पूल वाहतुकीसाठी खुला झाल्याने या भागातील नागरिकांना व वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

भूसंपादनातील अडचणीमुळे विलंब

मुठा नदीवरील पुलाची सातारा ते मुंबईच्या दिशेने असलेल्या पुलाच्या खालील बाजूस स्मशानभूमी आहे. त्या ठिकाणी पुलाच्या विस्तारीकरणासाठी सुमारे १२ मीटर जागेची आवश्यकता आहे. मात्र त्यासाठी भूसंपादन करण्यात काही अडचण येत आहेत. त्याचा परिणाम कामावर झाला आहे. महामार्ग प्राधिकरणाने जूनपर्यंत पुलाची ही बाजू वाहतुकीसाठी खुली करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या पुलावर देखील तीन मार्गिका असतील.

वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मुठा नदीवरील पुलाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. या पुलाची एक बाजू वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. पुलाच्या दोन्ही बाजूवर सहा मार्गिका असून पैकी तीन मार्गिकांवरून वाहतूक सुरू झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

- संजय कदम, प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पुणे

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.