मुख्य जलवाहिनीची गळती रोखण्यात यश
लाखो लिटर पाण्याची नासाडी थांबली
माणगाव, ता. २२ (वार्ताहर) ः माणगाव नगरपंचायतीच्या उतेखोल येथील कालव्यावरील जुन्या पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य वाहिनीला झालेली मोठी गळती थांबविण्यात यश आले आहे. पाणीपुरवठा सभापती अजित तार्लेकर यांनी रविवारी (ता. २२) तातडीने दखल घेत ही दुरुस्ती पूर्ण करून घेतली, यामुळे वाया जाणारे लाखो लिटर पाणी वाचले आहे.
कालव्यावरील मुख्य वाहिनीला मोठे खिंडार पडले होते. हे पाणी झाडाझुडपांतून कालव्याच्या ओहोळात वाहत होते. मात्र, परिसरातील एका सुज्ञ नागरिकाने ही बाब अजित तार्लेकर यांच्या निदर्शनास आणून दिली. तार्लेकर यांनी रविवारी सुट्टी असूनही नगरपंचायत पाणी पुरवठा कर्मचारी दिनेश मढवी यांच्यासह प्रत्यक्ष स्थळाची पाहणी करुन दुरुस्तीचे काम युध्द पातळीवर करुन घेतले. जवळपास सहा तासांच्या अथक मेहनतीनंतर पाणीगळती थांबविण्यात यश आले, परिणामी शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत झाला आहे. यावेळी पाणीपुरवठा कर्मचारी दिनेश मढवी, चंद्रकांत सोंडकर, विलास काळे, अविनाश पाटील, चंद्रकांत चव्हाण, सुनिल तार्लेकर, अमोल बुटे आदी उपस्थित होते.