क्रेडिट स्कोअरचा संबध आता केवळ कर्ज मिळण्यापुरता राहिला नसून, आता नोकरी देताना अन्य बाबींसोबत क्रेडिट स्कोअरसुद्धा विचारात घेतला जात आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात उत्तम शैक्षणिक पात्रता, अनुभव व विशेष कौशल्य असूनही नोकरी नाकारली जात असल्याचे काहीवेळा दिसून येते, याचे प्रमुख कारण म्हणजे संबंधित उमेदवाराचा क्रेडिट स्कोअर समाधानकारक नसणे, हे होय. विशेषतः बँका, वित्तीय संस्था, व्यवस्थापनातील मोठ्या जबाबदारीचे पद अशा ठिकाणी अंतिम निवड करण्यापूर्वी संबंधित व्यक्तीचा क्रेडिट स्कोअर पाहाण्यासाठी अनुमती घेतली जाते आणि क्रेडिट स्कोअर समाधानकारक नसेल, तर इतर निकषांवर उमेदवार योग्य असला, तरी या कारणावरून नाकारले जाते.
प्रमुख कारणे
विश्वासार्हता : क्रेडिट स्कोअर समाधानकारक असणे, हे आर्थिक शिस्तीचे द्योतक आहे. अशी व्यक्ती आर्थिक व्यवहार योग्य रीतीने हाताळू शकेल, असा विश्वास वाटतो. याउलट व्यक्तीवर कर्जाचे ओझे असेल किंवा आर्थिक शिस्त नसेल, तर अशी व्यक्ती गैरव्यवहार करण्यास प्रवृत्त होऊ शकते किंवा व्यवहारात गोंधळ करू शकते.
आर्थिक शिस्त : आर्थिक शिस्त असल्याने मानसिक स्वास्थ्यसुद्धा चांगले असू शकते त्यामुळे काम करीत असताना चलबिचल होण्याची शक्यता कमी, परिणामी अपेक्षित काम योग्य रीतीने केले जाऊ शकते.
थोडक्यात, आजच्या स्पर्धात्मक युगात नोकरी मिळण्यात क्रेडिट स्कोअरचा निश्चित प्रभाव पडतो. चांगला क्रेडिट स्कोअर
एक जमेची बाजू असते. आर्थिक विश्वासार्हता आवश्यक असलेल्या संवेदनशील पदासाठी (उदा. लेखापाल, रोखपाल, वित्त अधिकारी,उच्च सुरक्षा मान्यता असणारी पदे) स्वच्छ आर्थिक इतिहास असणे महत्त्वाचे असते आणि म्हणूनच क्रेडिट स्कोअरचे महत्त्वही वाढले आहे. त्यामुळे क्रेडिट स्कोअर चांगला ठेवणे अत्यंत आवश्यक झाले आहे. त्यासाठी आर्थिक शिस्त बाणविणे आणि आर्थिक व्यवहार विचारपूर्वक करणे महत्त्वाचे आहे.
सरकारी बँकेतील नोकरीसाठी
नुकतेच १६ मार्च २०२६ रोजी संसदेत लेखी उत्तरात अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सांगितले, की ‘आयबीपीएस’द्वारे (इन्स्टिट्यूट ऑफ बँकिग पर्सोनेल सिलेक्शन) राष्ट्रीयीकृत बँकेत नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचा क्रेडिट स्कोअर समाधानकारक असणे आवश्यक असणार आहे. किमान क्रेडिट स्कोअर हा संबंधित बँकेच्या धोरणावर अवलंबून असेल. याशिवाय काही खासगी कंपन्यासुद्धा आजकाल अर्जदाराचा क्रेडिट स्कोअर विचारात घेतात.