Datta Meghe Passes Away : विदर्भाचा बुलंद आवाज हरपला ! माजी मंत्री दत्ता मेघे यांचे निधन, ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
esakal March 23, 2026 11:45 AM

ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि विदर्भातील प्रभावशाली राजकारणी दत्ता मेघे यांचे रविवारी (२२ मार्च) रात्री वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. नागपूर येथील त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.दत्ता मेघे हे हिंगणा विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार समीर मेघे यांचे वडील होते.

दत्ता रघोबाजी मेघे यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९३६ रोजी वर्धा जिल्ह्यातील पवनार येथे झाला होता. त्यांनी नागपूर विद्यापीठातून १९६३3 मध्ये बी.ए. पदवी प्राप्त केली. दीर्घ राजकीय कारकीर्दीत त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि नंतर भारतीय जनता पक्ष (भाजप) या पक्षांमध्ये काम केले. ते चार वेळा लोकसभा सदस्य म्हणून निवडून आले होते – रामटेक, वर्धा आणि नागपूर मतदारसंघांतून. विदर्भातील तीन वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघांतून खासदार म्हणून निवडून येणारे ते एकमेव नेते होते.

काँग्रेस सरकारच्या काळात ते नागपूरचे पालकमंत्री होते. राज्यसभेचे सदस्य, महाराष्ट्र विधान परिषद सदस्य आणि राज्याचे विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात त्यांचे भरीव योगदान आहे. त्यांनी स्थापन केलेल्या मेघे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सद्वारे विदर्भात अनेक शैक्षणिक संस्था उभ्या राहिल्या, ज्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळाली.

दत्ता मेघे हे हिंगणा विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार समीर मेघे यांचे वडील होते. त्यांच्या निधनानंतर राजकीय नेत्यांकडून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहत म्हटले, "ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी मंत्री आणि माझ्या ज्येष्ठ बंधूसारखे असलेले दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. दत्ताभाऊंच्या जाण्याने विदर्भाच्या राजकीय व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे."

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहत म्हटले आहे की, विदर्भाच्या विकासात मोलाचे योगदान देणारे महाराष्ट्राचे एक ज्येष्ठ नेते दत्ताभाऊ मेघे यांचे निधन ही राज्यासाठी एक मोठी हानी आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो आणि त्यांच्या शोकाकुल कुटुंबाला हे दुःख पेलण्याची शक्ती मिळो, अशी मी ईश्वराचरणी प्रार्थना करतो.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.