अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढणार? आता शिवनिका ट्रस्टच्या सदस्यांचीही होणार चौकशी
मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा March 23, 2026 01:16 PM

Ashok Kharat and Rupali Chakankar: नाशिकमध्ये भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे होत असताना आता तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. खरातचे कर्मचारी आणि मंदिरातील पुजाऱ्यांनंतर शिवनिका संस्थानच्या विश्वस्तांचीही चौकशी होऊ शकते, अशी माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. त्यामुळे या प्रकरणात माजी विश्वस्त असलेल्या रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांचीही चौकशी होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवनिका संस्थानचे अध्यक्षपद स्वतः अशोक खरातकडे होते. काही वर्षांपूर्वी जुन्या ट्रस्टींनी साथ सोडल्यानंतर नव्या विश्वस्तांची नियुक्ती करण्यात आली होती. यामध्ये खरातने स्वतःच्या पत्नीचाही समावेश केला होता, तर रुपाली चाकणकर याही या संस्थानच्या विश्वस्त मंडळावर होत्या. 

Ashok Kharat and Rupali Chakankar: विश्वस्त मंडळाचा फलक अचानक गायब

दरम्यान, रुपाली चाकणकर यांनी यापूर्वीच विश्वस्त मंडळाची मुदत ऑगस्ट 2025 मध्ये संपल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, खरात अटकेत गेल्यानंतर संस्थानच्या विश्वस्त मंडळाचा फलक अचानक गायब झाल्याची बाब समोर आल्याने संशय अधिक गडद झाला आहे. तपास यंत्रणेकडून विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले असून, संस्थानमधील कारभार, निर्णयप्रक्रिया आणि आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी केली जात आहे. याच अनुषंगाने संबंधित ट्रस्टींना चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यात वर्तवली जात आहे. 

Rupali Chakankar: रुपाली चाकणकरांचा राजीनामा 

दरम्यान, या प्रकरणामुळे आधीच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. अशोक खरातच्या पाद्यपूजेचे काही फोटो समोर आल्यानंतर विरोधकांनी रुपाली चाकणकर यांच्यावर जोरदार टीका केली होती आणि त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांना राजीनामा देण्याच्या सूचना केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांनी आपला राजीनामा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सुपूर्द केला. एकूणच, अशोक खरात प्रकरणात तपासाचा फास अधिक घट्ट होत असून, येत्या काळात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवनिका संस्थानशी संबंधित सर्व व्यक्तींची भूमिका तपासली जाणार का, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

आणखी वाचा 

Ashok Kharat Nashik Crime: एक चिंचोका 1 लाखाला विकायचा, नकली साप, अन् वाघाच्या कातडीने भीती दाखवायचा; अशोक खरात लोकांच्या भावनांशी कसा खेळायचा? धक्कादायक माहिती समोर

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.