ज्या पक्षाची गल्ली ते दिल्ली सत्ता त्या पक्षानं एका झेडपी अध्यक्षपदासाठी मित्रपक्षांचे नाक दाबलं ही 2029 ची वॉर्निंग बेल‌, दोन्ही पक्षांनी हा टिझर लक्षात ठेवावा; रोहिणी खडसेंचा गर्भित इशारा
जयदीप मेढे March 23, 2026 01:13 PM

Rohini Khadse on Mahayuti: "शरण जाणारे गुलाम ठरतात आणि लढणाऱ्यांचा इतिहास सांगितला जातो," अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) नेत्या रोहिणी खडसे यांनी महायुतीतील मित्रपक्षांना इशारा दिला आहे. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या वेळी झालेल्या हायव्होल्टेज ड्राम्याचा दाखला देत, खडसे यांनी भाजपवर कडक टीका केली असून हा 2029 च्या 'पिक्चर'चा केवळ 'टीझर' असल्याचे म्हटले आहे.

नेमकी घटना काय?

सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांची युती होती. या दोन्ही पक्षांकडे मिळून 35 सदस्य होते, तर भाजपचे 27 सदस्य निवडून आले होते. संख्याबळानुसार राष्ट्रवादी-शिवसेना युतीची सत्ता येणे निश्चित होते. मात्र, भाजपने अध्यक्षपदासाठी प्रतिष्ठा पणाला लावली. निवडीच्या दिवशी मोठा राडा झाला. पालकमंत्री शंभूराज देसाई आणि कॅबिनेट मंत्री मकरंद पाटील यांना आपल्याच सदस्यांना सभागृहापर्यंत नेण्यासाठी पोलिसांशी आणि प्रशासनाशी झुंज द्यावी लागली. या झटापटीत शंभूराज देसाई जखमी झाले, तर मकरंद पाटील यांना 20-25 पोलिसांनी घेरले होते. अखेर, प्रशासकीय बळाचा वापर करून भाजपने आपला अध्यक्ष निवडून आणला.

काय म्हटलं आहे ट्विटमध्ये?

सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या दिवशी जे काही झाले त्यातून काय सावध बोध घ्यायचा आहे, तो सत्तेतील इतर दोन पक्षांनी घ्यायला हवा ! सत्ताधारी मित्र पक्षांसाठी धोक्याची घंटा ! सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी (अजित) आणि शिवसेनेची(एकनाथ शिंदे)ची निवडणूकपूर्व युती होती. दोघांचे मिळून ३५ सदस्य निवडून आले तर भाजपचे २७ सदस्य निवडून आले होते. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेची सत्ता कशीही बसणार होती. पण भाजपला कुठल्याही परिस्थितीत जिल्हा परिषद अध्यक्षपद हवे होते. राष्ट्रवादी आणि सेना या दोन्ही पक्षांनी सावधगिरी म्हणून आपले निवडून आलेले सदस्य जवळपास महिनाभर अज्ञातस्थळी ठेवलेले. अध्यक्ष निवडायचा आधीही मोठे रणकंदन झाले. मोठा भाऊ असलेल्या भाजपने पोलीस, प्रशासनाच्या मदतीने हे सदस्य शोधण्याचा प्रयत्न केला.

काहींच्या नातेवाईकांना तर जबरदस्ती सदस्य हरवले असल्याची तक्रार करायला लावली. अध्यक्ष निवडीच्या दिवशीही मोठा राडा घालण्यात आला. एकाबाजूला शिवसेनेचे शंभूराज देसाई जे माजी गृह राज्यमंत्री आहेत, ज्यांनी ग्रामीण गृह विभागाची धुरा सांभाळली आहे. सध्याच्या घडीला ते सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचे मकरंद पाटील जे सध्या राज्यात कॅबिनेट मंत्री आहेत. या दोघांनाही सदस्यांना सभागृहापर्यंत पोहोचवण्यासाठी अक्षरशः जीव पणाला लावावा लागला. यात शंभूराज देसाई जखमी झाले तर राष्ट्रवादीच्या मकरंद आबांना २०-२५ पोलिसांनी गराडा घातला. शेवटी काय झाले तर भाजपचा अध्यक्ष निवडण्यात आला.

ज्या पक्षाची गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता आहे. त्या पक्षाने एक जिल्हा परिषद अध्यक्ष निवडण्यासाठी इतर मित्र पक्षांचे पार नाक दाबले. ही २०२९ ची वॉर्निंग बेल‌ आहे, शत प्रतिशत भाजपसाठी टाकलेले पहिले पाऊल आहे. सत्तेतील इतर दोन पक्षांनी लक्षात ठेवावं हा तर टिझर आहे, २०२९ ते तुम्हाला पिक्चर दाखवतील त्यामुळे लढायचे की शरण जायचे ते ठरवा ! शरण जाणारे गुलाम ठरतात आणि लढणाऱ्यांचा इतिहास सांगितला जातो !

शेवटी पियुष मिश्रा यांच्या कवितेतील या ओळी ध्यानात ठेवा वो दया का भाव या की शौर्य का चुनाव या की हार को वो घाव तुम ये सोच लो

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.