स्मार्ट माहिती: 'क्रिप्टो'ला सोन्याचा आधार!
esakal March 23, 2026 09:45 AM

ॲड. सुनील टाकळकर : ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ व विमा सल्लागार

आता क्रिप्टो करन्सी म्हणजे आभासी चलनातील गुंतवणूक हा पर्याय सर्वसामान्य गुंतवणूकदारांनाही परिचयाचा झाला आहे. अशा ‘क्रिप्टो मार्केट’मध्ये सोन्याची सुरक्षितता आणि ‘क्रिप्टो’ची गतिशीलता यांचा मेळ घालणाऱ्या ‘टेथर गोल्ड’सारख्या (Tether Gold - XAUt) डिजिटल मालमत्तांनी गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले आहे. सध्याच्या जागतिक अस्थिरतेत मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदार याकडे वळत असल्याचे दिसत आहे. हा नेमका काय प्रकार आहे, त्याविषयी जाणून घेऊ या.

‘आभासी सोने’ म्हणजे काय?

‘टेथर’ (Tether) ही कंपनी प्रामुख्याने त्यांच्या ‘यूएसडीटी’ (USDT) या डॉलरशी निगडित स्टेबल कॉइनसाठी ओळखली जाते. मात्र, त्यांनी आता ‘एक्सएयूटी’ (XAUt) नावाचे एक विशेष टोकन बाजारात आणले आहे. हे टोकन म्हणजे प्रत्यक्ष सोन्याचे डिजिटल रूप आहे. जेव्हा गुंतवणूकदार एक ‘टेथर गोल्ड’ टोकन खरेदी करतात, तेव्हा त्या बदल्यात स्वित्झर्लंडमधील सुरक्षित व्हॉल्टमध्ये ‘वन ट्रॉई औंस’ (साधारण ३१.१ ग्रॅम) शुद्ध सोने त्यांच्या नावावर आरक्षित केले जाते. प्रत्येक टोकन हे एका विशिष्ट सोन्याच्या लगडीशी (Gold Bar) जोडलेले असते. गुंतवणूकदार ब्लॉकचेनवर आपल्या सोन्याच्या लगडीचा अनुक्रमांक तपासून पाहू शकतात. ही पूर्ण सोन्याची लगड खरेदी करणे सर्वांना परवडणारे नसते; पण डिजिटल स्वरूपात अतिशय छोटा अंश (उदा. ५००-१००० रुपयांत) खरेदी करता येतो.

युद्धकाळात गुंतवणूक वाढ

जेव्हा जगात युद्धाची ठिणगी पडते, तेव्हा शेअर बाजार कोसळतो आणि चलनांचे मूल्य कमी होते. अशा वेळी गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय शोधतात. युद्धकाळात प्रत्यक्ष सोने घेऊन एका देशातून दुसऱ्या देशात जाणे कठीण आणि जोखमीचे असते. याउलट, डिजिटल सोने तुमच्या ‘क्रिप्टो वॉलेट’मध्ये असते, जे जगात कुठेही बसून काही सेकंदात रोखीने वटवता येते. युद्धामुळे महागाई वाढते. सोन्याचे भावही वाढतात. त्यामुळे डिजिटल सोने ही महागाईपासून वाचण्याची आधुनिक पद्धत ठरत आहे. सोन्याचे दुकान किंवा शेअर बाजार बंद असू शकतो; पण ‘क्रिप्टो’ मार्केट २४ तास सुरू असते. आणीबाणीच्या प्रसंगी ही तरलता (Liquidity) अत्यंत महत्त्वाची ठरते.

काय खबरदारी घ्यावी?

१ कर आकारणी ः कोणत्याही डिजिटल मालमत्तेच्या नफ्यावर ३० टक्के कर आणि एक टक्का टीडीएस लागू आहे. सोन्याच्या दागिन्यांवर लागणाऱ्या करापेक्षा हा कर अधिक आहे.

२ नियामक अभाव : शेअर बाजारासाठी ‘सेबी’ ही नियामक यंत्रणा आहे; पण ‘क्रिप्टो’साठी अद्याप कोणतीही मध्यवर्ती तक्रार निवारण यंत्रणा नाही. कंपनी बुडाली किंवा सायबर हल्ला झाला, तर दाद मागणे कठीण जाऊ शकते.

३ एक्स्चेंजची निवड : केवळ ‘एफआययू-इंडिया’कडे नोंदणीकृत असलेल्या भारतीय एक्स्चेंजचाच वापर करा. परदेशी एक्स्चेंजवर व्यवहार करणे कायद्याच्या कचाट्यात आणू शकते.

४ डिजिटल ‘की’ ः तुमचे डिजिटल सोने ज्या वॉलेटमध्ये आहे, त्याची ‘की’ किल्ली कोणाशीही शेअर करू नका. ती हरवली, तर तुमचे सोने कायमचे जाऊ शकते.

थोडक्यात, गुंतवणूकदारांनी ‘क्रिप्टो’ सोन्याच्या बाबतीत कायदेशीर, तांत्रिक आणि प्राप्तिकराच्या तरतुदींची काटेकोर अंमलबजावणी लक्षात घेऊनच याबाबत जोखीम घ्यावी.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.